हिंगोली : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर काही नियम व अटींवर हॉटेल सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोनामुळे अनेक महिने घरचे अन्न खाऊन कंटाळलेले नागरिक आता जिभेचे लाड पुरविण्यासाठी हॉटेलमध्ये जात असल्याचे दिसत आहेत. मात्र मसालेदार, चमचमीत पदार्थ खाल्ल्यामुळे पोटाचे विकार उद्भवू शकतात. त्यामुळे आहाराचे नियम पाळून आरोग्य सांभाळावे, असा सल्ला डॉक्टर देत आहेत.
जिल्ह्यात कोरोनामुळे काही निर्बंध घालण्यात आले होते. यात हॉटेलही बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक दिवस हॉटेल बंद होती. आता कोरोना रुग्णसंख्या घटल्याने काही नियम व अटी घालून हॉटेल सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांची पावले आता हॉटेलकडे वळली आहेत. एकीकडे हॉटेल काही वेळ सुरू राहणार असले तरी पावसाळ्यात विविध आजाराची शक्यता असते. त्यामुळे हॉटेलातील पदार्थ खाताना आरोग्याची काळजी घेणेही गरजेचे बनले आहे. तेलकट, तुपकट, मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटाच्या तक्रारी सुरू होतात. अपचन, ॲसिडिटी, जुलाब होणे, अतिसार यामुळे तब्येत बिघडते. पचनसंस्थेवर ताणही निर्माण होतो. पावसाळ्यातच आतड्यांशी संबधित विकार वाढणे, बद्धकोष्ठता, पाेटदुखी असे त्रास जास्त होतात. तसेच हॉटेलमधील चमचमीत पदार्थ खाल्ल्याने वजनवाढीची शक्यता निर्माण असते. त्यामुळे हॉटेलमधील चमचमीत पदार्थ खाताना आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत.
पावसाळ्यात हे खायला हवे
- पावसाळ्यात घरी बनविलेले ताजे पदार्थ खावेत.
- उकडलेले, उकळलेले, भाजलेले पदार्थ खाण्यावर भर द्यावा.
-पचायला हलके पदार्थ खाल्ल्याने पोटविकार उद्भवण्याची शक्यता कमी होते.
- पावसाळ्यातही भरपूर पाणी पिण्याची सवय कायम ठेवावी.
पावसाळ्यात हे खाणे टाळयला हवे
-उघड्यावरील आणि शिळे पदार्थ खाऊ नयेत.
- फास्ट फूड, मसालेदार, तेलकट पदार्थ टाळावेत.
-पचनसंस्थेवर ताण येतील असे पदार्थ खाणे टाळावे.
- पोटात गॅस होतील असेही पदार्थ खाणे टाळावे.
रस्त्यावरचे अन्न नकोच
पावसाळ्यात रोगराई पसरण्याची शक्यता जास्त असते. उघड्यावरील पदार्थांवर मच्छर, डास, माशा बसतात त्यामुळे असे पदार्थ खाल्ल्याने संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी उघड्यावरील पदार्थ खाणे टाळलेलेच बरे.
पावसाळ्यात कीटकजन्य आजार उद्भवण्याची शक्यता असते. पावसाळ्यात हात नियमित स्वच्छ धुवावेत. पाणी उकळून प्यावे. उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळावे.
- डॉ. देवेंद्र जायभाये, वैद्यकीय अधिकारी
पावसाळ्यात पाणी शुद्ध प्यावे. तसेच बाहेरचे उघड्यावरील अन्न खाण्याचे टाळावे. ताजे व घरी शिजविलेल्याच अन्नपदार्थाचे सेवन करावे. फास्ट फूड खाण्याचा मोह टाळावा.
- डॉ. दीपक मोरे, बालरोगतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय, हिंगोली