Drought In Marathwada : तब्बल पाच किलोमीटरवरून पिण्याचे पाणी आणावे लागते चोरून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 08:13 PM2018-12-03T20:13:02+5:302018-12-03T20:14:13+5:30

पाणीबाणी : पाण्याची चोरी करायची आणि पाणी गावात आणल्यानंतर त्या टाकीला कुलूप लावून सुरक्षा करायची,

Drought in Marathwada: Stolen water has to be collected from five kilometers | Drought In Marathwada : तब्बल पाच किलोमीटरवरून पिण्याचे पाणी आणावे लागते चोरून 

Drought In Marathwada : तब्बल पाच किलोमीटरवरून पिण्याचे पाणी आणावे लागते चोरून 

Next

- गजानन वाखरकर, टाकळखोपा, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली

तब्बल पाच कि. मी. पायी अंतर चालून पाण्याची चोरी करायची आणि पाणी गावात आणल्यानंतर त्या टाकीला कुलूप लावून सुरक्षा करायची, हे वास्तव चित्र औंढा नागनाथ तालुक्यातील टाकळखोपा या गावात पाहायला मिळते.  येथील महिलांचा अख्खा दिवस पाणी भरण्यातच जात आहे. 

युती शासनाच्या काळात मंत्री असताना डॉ.जयप्रकाश मुंदडा यांनी २० गाव पाणीपुरवठा योजना मंजूर केली. तिचे पाणी या गावाला मिळत नव्हते. तत्कालीन आ.जयप्रकाश दांडेगाकर यांनी २०१४ मध्ये या योजनेला हे गाव जोडले. नंतर पाणी फक्त दोन महिने मिळाले. त्यानंतर ही योजना बंद पडली. ती आजतागायत सुरूच झाली नाही. टाकळखोपा गावाची लोकसंख्या तीनशे आहे. या गावात नळ योजना नाही. 

दोन विहिरी असून, त्या आता कोरड्या पडल्या आहेत. एक विंधन विहीर आटली आहे. पावसाळ्यापुरता या तिन्ही स्रोतांचा आधार होतो. येथे एप्रिल-मेमध्ये टँकर सुरू होते. एरवी लोक शंकर जाधव आणि पुरभाजी जाधव या शेतकऱ्यांच्या शेतामधून पाणी आणतात. हे स्रोत गावापासून तीन ते चार कि. मी. अंतरावर आहेत. तेथेही २० दिवस पुरेल एवढेच पाणी आहे. त्यामुळे ते दोघेही आता पाणी देण्यास नकार देत आहेत. स्वत:ला व जनावरांना पिण्यासाठी पाणी शिल्लक ठेवत आहेत. 

गावकऱ्यांना सध्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात भटकंती करावी लागत आहे. तरीही हा शेतकरी कुठे बाहेर गेला तर तेथून गावकरी चोरून पाणी भरतात. नाईलाजाने हे करावे लागते, असे गावकऱ्यांनी सांगितले.  शाळेतही पाण्याची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना घरूनच पाणी न्यावे लागते. माणसांचीच ही अवस्था असल्याने गुरांचे हाल तर विचारायलाच नको. ग्रामसेवकही गावात येत नाही. आमदार, खासदार, जि. प., पं. स. सदस्यांचे तोंड निवडणुकीच्या काळातच दिसते. हे कोणीच फिरकत नसल्याने समस्या कायम आहेत. 

सरपंच काय म्हणतात?
टाकळखोपा हे ग्रुप ग्रामपंचायत शिरला अंतर्गत येते. या गावात पिण्याच्या पाण्यासाठी शासनाच्या वतीने काहीच उपाययोजना केली नाही. गतवर्षी विहीर अधिग्रहण केली होती. त्याचे पैसे दिले नसल्याने यंदा अधिग्रहण करण्यास विरोध केला आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यातच टँकरने पाणीपुरवठा करण्याचा ठराव दिला आहे.
    - रमेश राऊत, सरपंच  

ग्रामस्थांचे हे आहे म्हणे : 
 

- आमच्या गावामध्ये पाणी नाही. आम्हाला हंडाभर पाण्यासाठी एक एक दिवस घालावा लागतो. पाणी आणायला गेल्यावर तेथेही आम्हाला दिवसभर बसावे लागते.  - गिरजाबाई जाधव

- आमच्या गावामध्ये कुठल्याही प्रकारचा पाणी स्रोत नाही. शासनाची पाण्याची योजना आमच्या गावात अद्यापपर्यंत आलीच नाही. त्यामुळे आम्हाला पाच किलोमीटरवरून शेतामधून पाणी आणावे लागते. आमचे सर्व पुरुष माणसे कामाला जातात. त्यामुळे आम्हाला व म्हाताऱ्या माणसालाच पाणी आणावे लागते. - चतुराबाई  टेकाळे   

- अद्यापपर्यंत शासनाची पाण्याची योजना आलेलीच नाही. त्यामुळे पाण्यासाठी आम्हाला वणवण भटकावे लागते. एका हंड्यासाठी आमचा दिवस दिवस जातो. - लक्ष्मीबाई जाधव

- आमच्या गावामध्ये पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे येथे कोणी पोरगी देत नाही. पाणी आणण्यात आणि घरातील कामातच महिलांचा दिवस निघून जातो. - रुक्मिणी जाधव

- आमच्या गावामध्ये दोन विहिरी असल्या तरीही त्या आटल्या आहेत. एक हातपंप आहे. मात्र त्याला पाणी नाही. एका शेतकऱ्याच्या शेतामधून पाणी आणावे लागते. तोही आणू देत नसल्याने चक्क पाण्याची चोरी करण्याचे दुर्दैव ओढवले आहे. - चंद्रभागा जाधव 

जिल्ह्यातील प्रकल्पस्थिती
मोठे प्रकल्प : 02 / 69 / 4.25%
मध्यम प्रकल्प : 00 / -- / --
लघु प्रकल्प : 26 / 19.204 / 36%

Web Title: Drought in Marathwada: Stolen water has to be collected from five kilometers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.