हिंगोलीत संचारबंदीमुळे शुकशुकाट; ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 06:08 PM2021-03-01T18:08:07+5:302021-03-01T18:09:16+5:30
शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या इंदिरा गांधी चौक ते महात्मा गांधी चौक परिसरात, जवाहर रोड, अकोला रोड, अग्रसेन चौक आदी परिसरांत शुकशुकाट होता
हिंगोली : जिल्ह्यात लागू केलेल्या संचारबंदीमुळे व्यापारपेठ बंद असून शहरात ठिकठिकाणी पोलीस दलातर्फे फिक्स पॉइंट लावून चोख बंदोबस्त ठेवला आहे. विनाकारण फिरणाऱ्यांना पोलीस विचारणा करीत असून तसेही नागरिक बाहेर पडत नसल्याचे चित्र आहे.
कोरोनाचा कहर अचानक वाढला असून त्यातच हिंगोलीतील रुग्णसंख्या दीडशे ते दोनशेच्या घरात गेली. त्यामुळे हिंगोलीकरांची घाबरगुंडी उडाली असून कोणी घराबाहेर पडताना दिसत नाही. पुन्हा एकदा नागरिकांनी कोरोनाची धास्ती घेतली असल्याचे दिसून येत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या इंदिरा गांधी चौक ते महात्मा गांधी चौक परिसरात, जवाहर रोड, अकोला रोड, अग्रसेन चौक आदी परिसरांत शुकशुकाट पाहायला मिळत होता. हिंगोलीत केवळ रुग्णालये व बँका सुरू असल्या, तरी या ठिकाणीही ग्राहक यावेळी फिरकत नसल्याचे दिसून आले. शासकीय कार्यालयांमध्येही कर्मचाऱ्यांशिवाय इतर अभ्यागतांची संख्या फारशी नव्हती.
संचारबंदीतही सकाळच्या वेळी मात्र काहींनी प्रवासाचा प्रयत्न केला. अशांना ठिकठिकाणी फिक्स पॉइंटवरील पोलिसांनी अडवून विचारणा केली. शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी व परवानाधारकांनाच जाऊ दिले जात होते. इतर अनेकांना माघारी फिरण्याची वेळ आली. दुपारनंतर मात्र उन्हाचा पारा वाढताच बाजारातच नव्हे, तर गल्लीबोळांतही कुणी बाहेर फिरकत नसल्याने शुकशुकाट पसरला होता.
बससेवाही बंद
कोरोनामुळे बससेवा बंद असल्याने अनेकांना आज इतर जिल्ह्यांत जाता आले नाही. इतर जिल्ह्यांतून येणाऱ्या बस स्थानकात येत होत्या. या ठिकाणी उतरलेल्या प्रवाशांचीही ॲण्टीजेन चाचणी करण्यात येत होती. परजिल्ह्यांतून येणारे प्रवासीही त्या संख्येत नसल्याचे दिसून येत होते.