हिंगोली : तालुक्यातील नर्सी नामदेव येथील संस्थानच्या कामकाजाबाबत योग्य उत्तरे मिळत नसल्याने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी संस्थान अध्यक्ष तहसीलदार गजानन शिंदे यांना चांगलेच धारेवर धरले.
आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मंदिर संस्थानच्या कामकाजाचा आढावा घेत विचारपूस केली. आ. तान्हाजी मुटकुळे यांनी मंदिराच्या दानपेटीतील जमा झालेल्या रक्कमेचा कुठलाही हिशेब नसून रक्कम कुठे खर्च केली. संस्थानकडे देणगी पावत्यांचे मागील काही वर्षांपासून आॅडिट नसल्याचे सांगितले. याबाबत आयुक्तांनी तहसीलदार तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष गजानन शिंदे यांना विचारले याबाबत काहीच माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे केंद्रेकर संतापले. संस्थानच्या अध्यक्षाला जर योग्य उत्तर देता येत नसेल तर त्याने सरळ घरचा रस्ता गाठावा, अशा कडक शब्दांत शिंदे यांची कानउघाडणी केली. केंद्रेकर यांनी अचानक आढावा घेतल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती.
आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देशदोन्ही समित्यांची योग्य ती सखोल चौकशी करून ८ दिवसांत या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना दिले. नर्सी नामदेव गावाजवळील ६० ते ७० एकर गावठाण जमीन ताब्यात आहे. त्यावर तहसीलदार यांनी अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे आ. मुटकुळे यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर आयुक्त ांनी ताबडतोब या प्रकरणाची चौकशी करून हा प्रश्न निकाली लावावा, असे निर्देश दिले.