औंढा तालुक्यात नापीकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 05:01 PM2019-01-25T17:01:35+5:302019-01-25T17:02:33+5:30
तालुक्यातील पुरजळ येथील एका शेतकऱ्याने नापीकीला कंटाळुन गुरूवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली.
जवळा बाजार ( हिंगोली) : औंढा नागनाथ तालुक्यातील पुरजळ येथील एका शेतकऱ्याने नापीकीला कंटाळुन गुरूवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली.
सविस्तर माहिती अशी की, औंढा तालुक्यातील पुरजळ येथील शेतकरी राजाराम मारोती वैद्य (४०) यांनी नापीकीला कंटाळून शेतशिवारातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत राजाराम वैद्य यांच्यावर बँकेचे ८५ हजार रूपये कर्ज होते. तसेच शेतात घेतलेले दोन्ही बोअर कोरडे गेल्याने ते खचले होते. नापीकी, कर्ज व बोअर कोरडे गेल्याने याच तणावातून त्यांनी गुरूवारी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलून जीवनयात्रा संपविली.
घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा करून आत्महत्येप्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. हिंगोली जिल्ह्यात दोन दिवसात शेतकरी आत्महत्येच्या दोन घटना घडल्या आहेत.