लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील गांधी चौक भागातील कस्तुरी कापड दुकानास पहाटे दोनच्या सुमारास लागलेल्या आगीत जवळपास अडीच ते तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. या दुकानातील साहित्य पूर्णपणे खाक झाले असून इमारतही क्षतीग्रस्त झाली आहे.गांधी चौक भागात प्रदीप पद्माकर दोडल यांचे खुप जुने प्रतिष्ठान असलेल्या कस्तुरी कापड दुकानास पहाटे दोनच्या सुमारास आग लागली. रात्र असल्याने ही आग वेळीच लक्षात आली नाही. ती निदर्शनास येईपर्यंत आतमध्ये सर्व कापडच असल्याने तिचा चांगलाच भडका उडाला होता. बघ्यांची गर्दी जमली असतानाही आगीच्या लोळापुढे कुणाचेच काही चालत नव्हते. तरीही काहींनी हिंमत करून शटरला दोरी बांधून ती दुरून ओढली. यात एक-दोन जणांना आस लागली. शिवाय हिंगोलीच्या अग्निशामक दलाचा बंबही आला. त्याचबरोबर कळमनुरीचा बंबही बोलावला होता. खाजगी टँकरही बोलावले होते. स्थानिक नागरिक, अग्निशामक दलाचे कर्मचारी अशा सर्वांनीच आग विझविण्यासाठी जीवतोड मेहनत घेतली. मात्र तरीही जवळपास साहित्य, रेडिमेड कापडाचे दालन, लग्नबस्ता, साड्या, शूटिंग, शर्टिंग अशा तिन्ही मजल्यांवरील माल जळून खाक झाला. आग आटोक्यात येण्यास दिवसच उजाडला होता. तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. तर आजूबाजूच्या दुकानांनाही आगीने घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र एका दुकानातील थोडेबहुत नुकसान झाले आहे. ते नेमके किती? याचा अंदाज नाही. आगीची तीव्रता एवढी जास्त होती की, काचा वितळल्या, लोखंडी गजाळ्याही वाकल्या. घटनास्थळी आ.तानाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, पोनि अशोक मैराळ यांच्यासह नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. तर अग्निशमन दलाच्या पथकासह पोलीस कर्मचारी व नागरिकांनी बाजूच्या दुकानातील साहित्य काढण्यास मदत केली. त्याही दुकानाचे काही प्रमाणात नुकसान झाले.अनर्थ टळलारात्री दोनच्या सुमारास व्यापारपेठेतील अनेकांनी आग विझविण्यासाठी तसेच ती इतरत्र भडकणार नाही, याची काळजी घेण्यासाठी मदत केली. अन्यथा मुख्य बाजारपेठ असलेल्या भागात ही आग लागली होती. शिवाय या भागात कापड दुकानांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ही आग वेळीच निदर्शनास न आल्यास आणखी काही दुकानांना झळ पोहोचण्याची भीती होती. तर दुकानाजवळ असलेल्या रेणुकादास दोडल यांच्याही दुकानाला आस लागल्याने त्याच्या काचा फुटल्या. दुकानातील साहित्याचे नुकसान झाले नसले तरी समोरून मात्र पूर्ण दुकान जळून खाक झाले.सागर ज्यूस सेंटरलाही आगअष्टविनायक चौक परिसरातील सागर ज्यूस सेंटरमध्येही शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात ज्यूस तयार करण्याच्या मशिन, फ्रीजर, फर्निचर, शीतपेयांच्या कॅरेटचे आगीमुळे नुकसान झाले आहे. एकाच दिवशी दोन घटना घडल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
हिंगोलीत आगीत दोन दुकाने भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 12:17 AM