सेनगाव (जि. हिंगोली): तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कंपनीने कृषिपंपाची कोणतीही पूर्व सूचना न देता वीज खंडित केली. या विरोधात जवळपास चार ते पाच शेतकऱ्यांनी ताकतोड शिवारात असलेल्या विहिरीत उडी मारून महावितरणचा निषेध केला.
तालुक्यातील ताकतोड गावासह अन्य दहा गावांतील कृषिपंपाचा वीजपुरवठा मागील आठ दिवसांपासून महावितरण कंपनीने तोडला आहे. रबी हंगामातील पिकांना पाणी देण्याची गरज असताना अशावेळी वीज नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे पिके पाण्याअभावी सुकू लागली अहेत. दोन दिवसांपूर्वी येथील शेतकऱ्यांनी सेनगाव तहसीलदारांना याबाबत निवेदन देऊन तातडीने वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करीत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. २६ नोव्हेंबर रोजी ताकतोडा येथील संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत तातडीने वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी करीत थेट विहिरीत उड्या मारून आंदोलन केले. त्यानंतर महावितरणच्या अधीक्षक अभियंता रजनी देशमुख यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. पोलीस व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी समजूत काढत शेतकरी आंदोलकांना शांत केले. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांच्यासह परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते.