गंभीर आजारावर पाच लाखांची शासन मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 12:49 AM2019-09-11T00:49:12+5:302019-09-11T00:49:31+5:30
मुख्यमंत्री सहायता निधीसह म.फुले जीवनदायी योजनेत गंभीर आजारावर मिळणारा लाभ जनतेपर्यंत पोहोचवा. आरोग्य विभागाचे काम चांगले असून गावातच लोकांना योग्य मार्गदर्शन व उपचार मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन आ. तान्हाजी मुटकुळे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मुख्यमंत्री सहायता निधीसह म.फुले जीवनदायी योजनेत गंभीर आजारावर मिळणारा लाभ जनतेपर्यंत पोहोचवा. आरोग्य विभागाचे काम चांगले असून गावातच लोकांना योग्य मार्गदर्शन व उपचार मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन आ. तान्हाजी मुटकुळे यांनी केले.
तालुकास्तरीय बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, शासनाने आरोग्याविषयी विविध उपाय केले आहेत. ग्रामपातळीवर यासाठी शासनाने यंत्रणा उभी केली आहे. त्यांच्यामार्फत लोकांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर योजनेचा लाभ मिळायला विलंब होतो. त्यामुळे रुग्णांना लक्षणानुसार वरच्या रुग्णालयात पाठविले तर योग्य वेळेत निदान होऊन शासन रुग्णांसाठी खर्च करीत असलेली रक्कम उपयोगात येईल. आपला जिल्हा आरोग्य सुविधा देण्यात राज्यात तिसऱ्या स्थानी आहे. मात्र हा भाग आणि परिस्थिती पाहता आपण पहिल्या स्थानीच आहोत असे मानले पाहिजे. तरीही पहिल्या स्थानावर येण्यासाठी प्रयत्न सोडू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी मंचावर महिला व बालकल्याण अधिकारी गणेश वाघ, भानुदास जाधव, संतोष टेकाळे, अॅड. अमोल जाधव, खेडेकर, शिंदे, कोटकर आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ.नामदेव कोरडे यांनी केले. यावेळी तालुक्यातून आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. संस्थात्मक प्रसुतीचे काम ९४ टक्क्यांवर पोहोचले असून जननी सुरक्षा योजनेत एप्रिलपासून आजपर्यंत ३४२ महिलांना लाभ दिला. पीएमएमव्हीवाय योजनेत १२६८ जणांना लाभ दिल्याचे सांगण्यात आले. मुलींचा जन्मदर हजारामागे ९८८ एवढा आहे. यात चांगली सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले. तर राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमात शाळांमध्ये ५0८ जणांना संदर्भ सेवा दिली. तर अंगणवाड्यांतून ५१८ जणांना संदर्भसेवा दिल्याचे सांगण्यात आले.