हिंगोली : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी भारत जनसंग्राम दिव्यांग आघाडीच्यावतीने बेमुदत ठिय्या आंदोलन केले जात आहे.
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती अद्याप तीन टक्के निधी वाटप करण्यास दिरंगाई करीत आहे. त्यामुळे याबाबत जाब विचारण्यासाठी 3 डिसेंबर रोजी जिल्हा कचेरीसमोर भारत जनसंग्राम दिव्यांग आघाडीच्यावतीने बेमुदत ठिय्या आंदोलन केले जात आहे. दिव्यांगांना शिवशाही बस मधून 75 टक्के सवलत देण्यात यावी, रमाई घरकुल योजनेचा थेट लाभ द्यावा, दिव्यांगांच्या निधीचा गैरवापर थांबवावा अशा मागण्या असल्याचे संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष सुनील मुलगीर यांनी सांगितले. आंदोलनात जिल्हाभरातील मोठ्या संख्येने दिव्यांग सहभागी झाले आहेत. शासनाकडून मोठ्या उत्साहाने जागतिक अपंग दिन साजरा केला जात आहे तर दुसरीकडे दिव्यांगांचे आंदोलन सुरू असल्याचे चित्र शहरात दिसत आहे.