वसमत (जि. हिंगोली) : येथील स्टेट बँक ऑफ इंडिया येथून सोयाबीनचे पैसे उचलून बाजारात येत असताना मोटरसायकलच्या डिक्कीतून चोरट्यांनी १ लाख रुपये लांबवले. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. विशेष म्हणजे पोलीस ठाण्याजवळ असलेल्या महावीर चौकातच ही घटना घडली आहे. याप्रकरणी वसमत शहर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
वसमत तालुक्यातील बाभूळगाव येथील शेतकरी माणिक बाबाराव नवघरे यांनी मंगळवारी दुपारी वसमत येथील इंडिया बँकेतून १ लाख रुपये काढले. हे पैसे गाडीच्या डिक्कीत दस्तीमध्ये बांधून ठेवले व मोटरसायकलवरू मुख्य रस्त्याने ते महावीर चौकाजवळील त्यांच्या दुकानात येत होते. पोलीस ठाणेजवळील चौकात चोरट्यांनी त्यांच्या डिक्कीतून पैसे लांबवून पोबारा केला. डिक्कीतून पैसे गायब झाल्याचे लक्षात येतात, पोलिसांना पाचारण करण्यात आले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे, पोलीस उपनिरीक्षक बी. एस. खारडे व पोलीस पथकाने पंचनामा केला.
परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. यामध्ये पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारांनी हातचलाखीने ही रक्कम लांबविल्याचे स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे बँकेतून पैसे घेऊन बाहेर पडल्यापासूनच या शेतकऱ्यावर पाळत ठेवून चोरट्यांनी हा डल्ला मारल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे. भरदिवसा पोलीस ठाण्याजवळच ही घटना घडली आहे.