हिवरखेडा भागात भीषण पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 12:26 AM2018-12-03T00:26:42+5:302018-12-03T00:27:20+5:30
तालुक्यातील हिवरखेडा, बोरखेडी या गावातील ऐन हिवाळ्यातच जलस्तर खालावल्याने ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नळ योजनेच्या विहिरींनीही तळ गाठला आहे. तालुक्यात डिसेंबर महिन्यातच पाणी टंचाईचे चटके जाणवू लागले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : तालुक्यातील हिवरखेडा, बोरखेडी या गावातील ऐन हिवाळ्यातच जलस्तर खालावल्याने ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नळ योजनेच्या विहिरींनीही तळ गाठला आहे. तालुक्यात डिसेंबर महिन्यातच पाणी टंचाईचे चटके जाणवू लागले आहेत.
यावर्षी सरासरीच्या तुलनेत साखरा मंडळात ६१ टक्के पाऊस झाल्यामुळे या भागातील भूजल पाणीपातळी घटली आहे. पावसाळ्यात नदी नाले ओढयांना पाणीच आले नाही. परिणामी पाणी पातळीतही वाढ झाली नाही. सुरेगाव ग्रामीण भागातील जलसाठा झपाट्याने कमी होत आहे. हिवरखेडा, बोरखेडी येथील नळ योजना विविध कारणांमुळे बंदच आहेत. पाण्याची टाकीही शोभेची वस्तू बनली आहे. सध्या ग्रामपंचायतकडून गावातील एकाच विहिरीत पाईपलाईनने पाणी सोडले जात आहे. तर गावातील एक विहीर कोरडी पडली आहे.
जलस्वराज विहिरीवरुन गावात पाणी पुरवठा होतो. मात्र या भागातील वीज पुरवठा सुरळीत राहत नसल्याने गावातील नागरिकांना गावाबाहेरून पाणी आणावे लागत आहे. हिवरखेडा येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी बारा महिनेही शेतातुन पाणी आणावे लागते. गावातील हातपंप गेल्या अनेक पासून बंदच आहेत.
याकडे लक्ष ग्रामपंचायतीने देऊन हातपंप दूरूस्त करण्याची मागणी आहे. गावातील दोन्ही विहिरीत पाणी सोडावे जेणेकरून करून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. बोरखेडी येथील नळ योजना अनेक वर्षांपासून बंद पडली आहे. याकडे बोरखेडी येथील ग्रामपंचायतने लक्ष देऊन येथील पाणी पुरवठा सुरळीत करावा.
याठिकाणी ऐन हिवाळ्यातच दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. असे असताना प्रशासनाने टंचाईग्रस्त गावांत पाणी टंचाई गंभीर होण्याआधी उपाय योजना करणे गरजेचे आहे.