हिंगोली : जिल्हाभरात शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. हिंगोली शहरातील शासकीय विश्रामगृह परिसरातील छत्रपती शिवरायांचा पुतळा परिसरात अभिवादनासाठी सकाळपासूनच शिवप्रेमींची एकच गर्दी झाली होती. मिरवणूक, कलशयात्रा, पोवाडे तसेच चिमुकल्यांनी सादर केलेले शिवरायांच्या देखाव्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ढोल-ताशांच्या गजरात शहरातील मुख्य मार्गावरून शिवरायांच्या प्रतिमेची मिरवणुक काढण्यात आली.
बहुजन प्रतिपालक, कुलवाडी भूषण राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि थाटात साजरी साजरी करण्यात आली. हिंगोली शहरात छत्रपती शिवरायांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी मागील अनेक वर्षांपासून शिवप्रेमींची ईच्छा होती. अखेर यंदा शिवरायांचा भव्य-दिव्य अश्वारूढ पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आल्याने यंदाच्या जयंतीत शिवप्रेमींचा आनंद द्विगुणीत झाला.
जयंतीनिमित्त प्रथम छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची पूजा करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने मान्यवर, शिवप्रेमी उपस्थित होते. त्यानंतर शहरातील मुख्य मार्गावरून दुचाकी रॅली काढण्यात आली. पोलीस प्रशासनाकडून यावेळी मुख्य मार्गावर तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहतुकीची कोंडी होणार नाही, याची खबदारी घेत वाहतूकही वळविण्यात आली होती. मिरवणुकीत चिमुकल्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे देखावे सादर केले. आकर्षक देखावे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. मुख्य मार्गावरून रॅली मार्गक्रमण करीत शिवरायांच्या पुतळा परिसरात दाखल झाली. शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शाहिरांनी पोवाडे तसेच गीतांचे सादरीकरण केले. यासोबतच जिल्हाभरात मिरवणूक, कार्यक्रम आदींच्या माध्यमातून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.