हिंगोली : गतवर्षी इतर फळपिके घेऊन फटका सोसणाऱ्या शेतकऱ्यांनी यंदा उन्हाळी पीक म्हणून भुईमुगाला प्राधान्य दिल्याने दीड ते दोन हजार क्विंटल शेंगाची आवक होत आहे; मात्र बाजारपेठ एक दिवसाआड सुरु राहात असून शेतकऱ्यांचा माल रस्त्यावर पडत असल्याने नाराजीचा सूर आहे.
हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षे दुष्काळी गेल्याने भुईमुगाची लागवड संपल्यात जमा होती; मात्र गतवर्षीपासून चांगले पर्जन्यमान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळी पिकेही घेता येत आहेत. यंदा कोरोनाचा कहर कायम असल्याने शेतकऱ्यांनी इतर फळपिकांना फाटा देत भुईमुगाच्या उत्पादनाकडे लक्ष वेधले. त्यात उतारा चांगला आला नसला तरीही यंदा जास्त प्रमाणात लागवड झाल्याने भुईमुगाच्या शेंगा मोठ्या प्रमाणात विक्रीस येत आहेत. दोन ते अडीच हजार क्विंटल शेंगाची आवक होत आहे. त्यातच एक दिवस तूर, हरभरा, सोयाबीन व एक दिवस भुईमुगाच्या शेंगासाठी दिला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात माल आणल्यावर रस्त्यावर टाकण्याची वेळ येत आहे. आता पावसाळ्याचे दिवस सुरू होत आहेत. मध्येच ढगाळ वातावरण व पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना माल भिजण्याची चिंता सतावत आहे. या नादात अनेकदा माल वाहनातून खाली उतरविलाही जात नाही. त्यातच बीटही वेळेवर होत नसल्याची बोंब होत आहे. या शेंगाना ४५०० रुपये ते ५३०० रुपयांचा भाव मिळत आहे.
तीन वर्षांनंतर यंदा भुईमुगाची आवक झाली. माल खरेदी केल्यानंतर ती पाठवायची अडचण होत आहे. कोरोनामुळे वाहने मिळत नसल्याने एक दिवसाआड बाजारपेठ सुरू राहात आहे.
प्रशांत सोनी,व्यापारी
मोंढ्याची जागा अपुरी पडत आहे. व्यापारी व शेतकऱ्यांना सुविधा नाहीत. शेतकऱ्यांचा माल रस्त्यावर पडत आहे. आम्हालाही कोरोनाने वाहने मिळत नाहीत. माल गुजरातला पाठवत आहोत.
ओमप्रकाश तापडिया, व्यापारी
भुसाराच्या मोंढ्यात मोठ्या असुविधा आहेत. याकडे बाजार समितीचे दुर्लक्ष आहे. माल रस्त्यावर टाकावा लागतो. पार्किंगची सोय नाही. रोज बीट व्हावे व वेळेत व्हावे, ही अपेक्षा.
-विठ्ठल घुगे, शेतकरी