हिंगोलीत बियाणांमध्ये भेसळीचा संशय; १०५ बियाणे नमुने पाठविले प्रयोगशाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 08:40 PM2018-06-26T20:40:44+5:302018-06-26T20:41:34+5:30

जिल्ह्यात एकूण ५१० कृषी परवानाधारक केंद्राची संख्या आहे. मात्र यातील काही कृषी केंद्रावर विक्री होत असलेल्या बियाणांमध्ये भेसळ असल्याचे लक्षात आले.

Hingoli seeds suspected of adulteration; 105 samples sent in laboratory | हिंगोलीत बियाणांमध्ये भेसळीचा संशय; १०५ बियाणे नमुने पाठविले प्रयोगशाळेत

हिंगोलीत बियाणांमध्ये भेसळीचा संशय; १०५ बियाणे नमुने पाठविले प्रयोगशाळेत

googlenewsNext

हिंगोली : जिल्ह्यात एकूण ५१० कृषी परवानाधारक केंद्राची संख्या आहे. मात्र यातील काही कृषी केंद्रावर विक्री होत असलेल्या बियाणांमध्ये भेसळ असल्याचे लक्षात आले. त्यामुळे अशा १०५ प्रकारच्या बियाणांचे नमुने शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून, तपासणी अहवाल येताच संबंधित कृषि केंद्र चालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली आहे.  

मागील चार ते पाच वर्षांपासून शेतकऱ्यांवर निसर्गाची अवकृपा असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. एके काळी ज्या शेतात क्विंटलने होणारे उत्पन्न आता किलोवर येऊन ठेपले आहे. मात्र भेसळयुक्त बियाणे विक्रीतून केंद्रचालक चांगलाच नफा मिळवित असल्याचे कृषी विभागाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या वतीने जिल्हास्तरावर आणि तालुका स्तरावर अशा एकूण सहा पथकाची नियुक्ती केली. 

पथकामार्फत कृषी केंद्रातील बियाणांचा धांडोळा घेऊन संशयित वाटलेल्या बियाणांचे नमुने घेतले जात आहेत. अशा प्रकारे एकूण १०५ प्रकारच्या बियाणांचे नमुने पथकाने जमा केले असून, ते शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविलेले आहेत. त्याचा येत्या काही दिवसांत अहवाल येणार असून, संबंधित ठिकाणच्या कृषी केंद्र चालकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. तर परवाना नसताना बी- बियाणे विक्री करणाऱ्या २२ कृषी केंद्रावरही कारवाई करून त्यांच्याकडून जवळपास २५ लाख रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे कृषी केंद्र चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पुढील महिन्यात खताचे नमुने घेण्यात येणार असल्याची माहिती जि.प. कृषी विभागाने दिली आहे. यामध्येही काही भेसळ आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. 

तक्रार दाखल करण्याचे आवाहन 
यंदा ७० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्याशिवाय पेरण्या न करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने केले होते. तरीही बऱ्याच शेतकऱ्यांनी आवाहनाकडे लक्ष न देता पेरणी आटोपली. मात्र जोरदार पाऊस होऊनही जर एखाद्या कंपनीच्या बियाणाची उगवणच न झाल्यास अशा शेतकऱ्यांनी मात्र घाबरून न जाता जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर कृषी विभागातर्फे उपलब्ध करून दिलेल्या तक्रार निवारण केंद्राशी संपर्क साधावा. जेथून बियाणे खरेदी केले त्याची पावतीसह इतर कागदपत्रांद्वारे तक्रार दाखल करावी. त्याची आठ दिवसांत समितीद्वारे चौकशी करून शेतकऱ्याच्या हातात अहवाल दिला जाणार आहे. तो अहवाल पुढील कारवाईसाठी उपयोगी पडणार असल्याचे जिल्हा परिषदेचे कृषि अधिकारी अंकुश डुब्बल यांनी सांगितले. 

Web Title: Hingoli seeds suspected of adulteration; 105 samples sent in laboratory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.