हिंगोली : कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढील आदेश येईपर्यंत मोंढा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, आता जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार मोंढा पूर्ववत सुरू केला असून, शेतीमालांची आवकही सुरू झाल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नारायण पाटील यांनी दिली.
गत दीड ते दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना माल आणणे अवघड झाले होते. मध्यंतरी शासनाने वेळेचे बंधन घातले होते. त्यामुळे परजिल्ह्यांतील शेतीमाल शेतकऱ्यांना आणणे आवघड होऊन बसले होते. सर्व बाजू लक्षात घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढील आदेशापर्यंत मोंढा बंद राहील, असे शेतकऱ्यांना सांगितले. १६ एप्रिल ते ३० एप्रिल या दरम्यान मोंढा बंद ठेवण्यात आला होता. मोंढा बंद ठेवल्यामुळे हमाल व रिक्षाचालकांची उपासमार होत होती. १ मे पासून मोंढा पूर्ववत सुरू करण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी जवळपास ६०० क्विंटल शेतीमालाची आवक झाली. यामध्ये चणा, तूर, सोयाबीन, हळद आदी शेतीमालाचा समावेश आहे.
जिल्हा प्रशासनाचे नियम पाळावेत
जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागत पूर्ण झाली आहे. बी-बियाणे, खते, शेतीविषयक औजारे आदी खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे; परंतु सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे शेतकऱ्यांनी पालन करून आपला शेतीमाल मोंढ्यात आणावा. मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतराचे भान ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.