जगायचे कसे? घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा २५ रुपयांनी महागले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:20 AM2021-07-04T04:20:35+5:302021-07-04T04:20:35+5:30
मागील तीन वर्षांत पेट्रोल व डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यातच आता खाद्यतेलाचेही दर वाढले आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट ...
मागील तीन वर्षांत पेट्रोल व डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यातच आता खाद्यतेलाचेही दर वाढले आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. कोरोनाच्या काळात आधीच रोजगार हिरावला आहे. आहे ते व्यवसायही ठप्प पडत आहेत. नेहमीपेक्षा मिळकत कमी झाल्याने घरखर्चात बचत करून जगणे सुकर करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र वाढती महागाई त्यात मिठाचा खडा टाकत आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना आगामी काळात कसे जगायचे, याची चिंता लागली आहे. याबाबत वारंवार ओरड होत असली तरीही यावर उपाय काही सापडत नसून केंद्र शासन दरही कमी करायला तयार नाही.
ऑगस्ट २०२० ते डिसेंबर २०२० मध्ये झालेली दरवाढ
महिना घरगुती व्यावसायिक
ऑगस्ट ८२० १७००
सप्टेंबर ८२० १७००
ऑक्टोबर ८२० १७००
नोव्हेंबर ८३५ १७००
डिसेंबर ८३५ १७००
घरखर्च भागवायचा कसा?
महागाईने कळस गाठला आहे. दोन वर्षांपासून कोरोनामुळे नागरिक अडचणीचे जीवन जगत आहेत. एक तर कोरोनात जीवाची भीती, दुसरीकडे महागाईही वाढत आहे. गोरगरिबांचे तर जगणे मुश्कील झाले आहे. गॅस सिलिंडरचे भावही वाढत चालल्याने बजेट कोलमडले आहे.
- राजश्री क्षीरसागर, जीनमातानगर
सिलिंडरचे दर पुन्हा वाढल्याने गोरगरिबांनी जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महागाई वाढतच चालली आहे. भाजीपाला, खाद्यतेल, अन्नधान्य याच्या किमतीसोबतच गॅसचे दर वाढले. उपाशी राहण्याची वेळ येणार आहे असे वाटते.
- सुषमा देशमुख, सेनगाव
जानेवारी २०२१ ते जुलैमध्ये झालेली दरवाढ
महिना घरगुती व्यावसायिक
जानेवारी ६३५ १७००
फेब्रुवारी ६३६ १७००
मार्च ८३५ १७००
एप्रिल ८३५ १७००
मे ८३५ १७००
जून ८३५ १७००
जुलै ८६० १७००
जुलै महिन्यात उच्चांकी वाढ
घरगुती गॅसच्या किमतीत सतत वाढ होत असल्याने अनेकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. जून महिन्यात ८३५ रुपयांना मिळणाऱ्या गॅस सिलिंडरसाठी जुलैमध्ये तब्बल ८६० रुपये ५० पैसे मोजावे लागत आहेत. जुलै महिन्यात उच्चांकी दरवाढ झाल्याचे दिसत आहे.
गावांत पुन्हा चुली पेटल्या
प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेत ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात गॅस जोडण्या दिल्या आहेत. खूप गवगवा करून ही योजना कार्यान्वित केली. कमी कागदपत्रे व रकमेत ही जोडणी मिळत असल्याने रांगा लावून अनेकांनी जोडणी घेतली. आता गॅसचे दर भडकल्याने हे सिलिंडर अडगळीला पडले असून केवळ काही घरांमध्येच त्यांचा वापर होत आहे. ग्रामीण भागात पुन्हा इंधनासाठी सरपणच आणले जात आहे. वाढत्या दराचे सिलिंडर परवडत नसल्याने महिलांच्या डोक्यावर मोळी व डोळ्यांना धुराचा त्रास सुरू झाला आहे.