'मी आत्महत्या करत आहे'; कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरील संदेशाने पोलीस यंत्रणेची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 12:18 PM2021-04-19T12:18:47+5:302021-04-19T12:20:07+5:30
स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या करीत असल्याचा संदेश १८ एप्रिल रोजी पोलिस कर्मचाऱ्यांच्या ग्रुपवर पाठविला.
हिंगोली : येथील एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या करीत असल्याचा संदेश १८ एप्रिल रोजी पोलिसांच्या ग्रुपवर पाठविला होता. त्यामुळे त्या कर्मचाऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणेला रात्रभर धावपळ करावी लागली. अखेर आज पहाटेच्या सुमारास तो कर्मचारी सुखरूप असल्याची खात्री पटल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या करीत असल्याचा संदेश १८ एप्रिल रोजी पोलिस कर्मचाऱ्यांच्या ग्रुपवर पाठविला. हा संदेश वाचल्यानंतर पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. रात्री वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्या कर्मचाऱ्यांचा शोध घेण्याच्या सूचना देत दोन पथके तत्काळ रवाना केली. या पथकाने पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी जाऊन पाहणी केली. तसेच परिसरातही शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र, कर्मचारी आढळून आला नाही. मोबाईल लोकेशनवरूनही शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, मोबाईल बंद असल्याने अंदाज येत नव्हता. त्यामुळे पथकांची चांगलीच दमछाक झाली.
रात्री उशिरापर्यंत पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत होते. अखेर आज पहाटेच्या सुमारास तो पोलीस कर्मचारी तालुक्यातील खानापूर चित्ता येथे असल्याचे समजले. त्यानंतर पोलीस पथकाने सुटकेचा नि: श्वास सोडला. आत्महत्येची धमकी देणारा पोलीस कर्मचारी सुखरूप असून तो कर्तव्यावर हजर होणार असल्याचे स्थागुशाचे पो.नि. उदय खंडेराय यांनी सांगितले. दरम्यान, त्या पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्येची धमकी नेमकी कोणत्या कारणाने दिली, याची माहिती मात्र समजू शकली नाही.