अन् स्थानक परिसरात लावले माहितीफलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 12:46 AM2018-11-07T00:46:38+5:302018-11-07T00:48:19+5:30
येथील बसस्थानकाची जुनी इमारत ऐन सणासुदीत पाडली जात आहे. त्यामुळे ऐन सणासूदीत प्रवाशांची तारांबळ होत असल्याच्या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच आगारातर्फे उभारण्यात आलेल्या बसथांबा शेडमध्ये माहिती फलक बसविण्यात आले आहेत
हिंगोली : येथील बसस्थानकाची जुनी इमारत ऐन सणासुदीत पाडली जात आहे. त्यामुळे ऐन सणासूदीत प्रवाशांची तारांबळ होत असल्याच्या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच आगारातर्फे उभारण्यात आलेल्या बसथांबा शेडमध्ये माहिती फलक बसविण्यात आले आहेत. सदर माहितीफलक नसल्यामुळे कोणती बस कुठे लागत आहे? लांब पल्ल्यावरील बस कोठून सोडल्या जात आहेत, याचा ताळमेळ नव्हता.
हिंगोली येथील बसस्थानकाच्या नवीन इमारत बांधकामाचा प्रश्न मार्गी लागला, असला तरी सदर प्रक्रिया संथगतिने सुरू आहे. जून महिन्यात जुनी इमारत पाडून बांधकामास प्रारंभ करण्याचे नियोजन करण्यात आले होते. शिवाय स्थानक परिसरातील उपहारगृह, दुकानचालकांनाही नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. परंतु प्रत्यक्षात मात्र इमारत बांधकामास हालचाली दिसून येत नव्हत्या. याबाबत आगारप्रमुखही काही बोलण्यास तयार नाहीत.
सदर बांधकाम प्रक्रिया विभागीय कार्यालय पभरणी येथून सुरू असल्याचे सोयीस्कर उत्तर दिले जात आहे. ऐन सणासुदीतच इमारत पाडण्यास अचानक सुरूवात केल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
पर्यायी व्यवस्था म्हणून बसथांब्याची व्यवस्था करण्यात आली असली तरी, या ठिकाणी साधे कोणती बस कोठून धावणार याचे माहिती फलकही बसविले नव्हते. त्यामुळे विविध मार्गावरून धावणाऱ्या बस कोठे उभ्या राहणार आहेत, हेच प्रवाशांना समजत नव्हते. शिवाय फलकही डकविण्यात आले नसल्यामुळे प्रवाशांना कंट्रोल रूमकडे चकरा माराव्या लागत असत.
ऐन सणासुदीत प्रवाशांची तारांबळ उडत असल्याचे लोकमतने ५ नोव्हेंबर रोजी वृत्त प्रकाशित केल्यानंतर ६ नोव्हेंबर रोजी माहितीफलक लावण्यात आले. त्यामुळे प्रवाशांची काही प्रमाणात का होईना, गैरसोय टळण्यास मदत होणार आहे.