कळमनुरी : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शाळांना मिळालेल्या तांदळाच्या रिकाम्या पोत्यांचा हिशेब शासनाने पुन्हा मागितला असून रिकामे पोते शोधण्यासाठी मुख्याध्यापकांची चांगलीच दमछाक होणार आहे.शालेय पोषण आहार योजनेंतर्गत मिळालेल्या तांदळाच्या रिकाम्या पोत्यांचा हिशेब मुख्याध्यापकांनी तत्काळ गटशिक्षणाधिकारी कार्यालयात जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. २०१२ ते २०१८ या सहा वर्षांतील सर्व पोत्यांचा हिशेब मागविला आहे. तालुक्यात २२० शाळांना शालेय पोषण आहार पुरवला जातो. तांदळाचे रिकामे पोते विक्री करून चलन शासन खाती भरावे, त्याची छायांकित प्रत जमा करण्याच्या सूचना केंद्रप्रमुखांना दिल्या आहेत. येथील गटशिक्षणाधिकारी राजेश पातळे यांनी शिक्षण संचालक व शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ३० जानेवारी रोजी पत्र काढले. रिकाम्या पोत्यांची विक्री करून रक्कम शासनखाती जमा करण्याचे आदेश दिले आहेत. सहा वर्षांच्या रिकाम्या पोत्यांचा हिशेब मागितल्याने मुख्याध्यापकांची चांगलीच गोची झाली आहे. पुन्हा रिकाम्या पोत्यांचा हिशेब शिक्षण संचालकांनी मागीतल्याने मुख्याध्यापक रिकामे पोते जमा करण्यात गुंतले आहेत. गत सहा वर्षांत अनेक मुख्याध्यापक सेवानिवृत्त झाले तर अनेकांची बदली झाली. आता रिकाम्या पोत्यांचा हिशेब सादर करायचा कसा? या विवंचनेत अनेक मुख्याध्यापक आहेत.वर्षभरात किती क्विंटल तांदूळ आले किती पोते होतात याची आकडेमोड करण्यातच मुख्याध्यापक हैराण आहेत. तर काही मुख्याध्यापक आता त्यापुढचे पाऊल उचलत असून रिकाम्या पोत्यांची जुळवाजुळव करत आहेत. सहा वर्षांपासूनची रिकामे पोती आणायची कोठून? असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे.रिकामे पोते मिळाले नाही तरी त्याची रक्कम मुख्याध्यापकांना शासनाकडे भरावी लागणार आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांना पदरमोड करून रक्कम भरावी लागणार आहे. रिकाम्या पोत्यांचा लेखाजोखाही आता मुख्याध्यापकांना ठेवावा लागणार आहे. शासनाच्या या फतव्यामुळे मात्र मुख्याध्यापक चांगलेच संतापले आहे. कुठून रिकाम्या पोत्याचा हिशोब द्यावा, असा प्रश्न ते करीत आहेत. रिकाम्या पोत्याच्या हिशेबाबत शासन मात्र आग्रही आहे. तर यातून काही रक्कमही तिजोरीत जमा होणार आहे.कुरतडलेली पोती शालेय पोषण आहाराच्या तांदळाचे पोते शाळेच्या खोलीत ठेवल्या जातात. या रिकाम्या पोत्यांना उंदीर कुर्तडतात. या पोत्यांचा हिशेब कसा ठेवणार? हे निकामी झालेले पोते कोणी लिलावात घेत नाहीत. त्यामुळे रिकाम्या पोत्यांचा हिशेब मागितल्याने मुख्याध्यापक अडचणीत आले आहे. यापूर्वीच काहींनी विकतचे पोते आणून हिशेब जुळविला होता. आता शासन पुन्हा रिकाम्या पोत्यांबाबत विचारत असल्याने मुख्याध्यापकांत नाराजीचा सूर आहे. शासनाने हा हिशोब मागू नये, असे मुख्याध्यापक प्रकाश नीळकंठे यांनी सांगितले.तर स्वत: पैसे भरारिकामे पोते गहाळ झाले असतील तरीही त्याचे पैसे मुख्याध्यापकांना भरावे लागणार आहेत. त्यामुळे मुख्याध्यापकांना पगारातून रक्कम भरावी लागणार आहे. या फतव्यामुळे मुख्याध्यापक मात्र हैराण आहेत.
मुख्याध्यापकांनो, पोत्यांचा हिशेब द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 12:50 AM
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शाळांना मिळालेल्या तांदळाच्या रिकाम्या पोत्यांचा हिशेब शासनाने पुन्हा मागितला असून रिकामे पोते शोधण्यासाठी मुख्याध्यापकांची चांगलीच दमछाक होणार आहे.
ठळक मुद्देअजब फतवा : यापूर्वीही केली होती पोत्यांची मागणी