खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:30 AM2019-03-27T00:30:43+5:302019-03-27T00:31:00+5:30
खून प्रकरणातील आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. शर्मा यांनी २६ मार्च रोजी जन्मठेप व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : खून प्रकरणातील आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. शर्मा यांनी २६ मार्च रोजी जन्मठेप व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्यात निर्मलाबाई दीपक वाठोरे (रा. शेगाव खोडके) यांनी २३ डिसेंबर २०१५ रोजी फिर्याद दिली होती. यात म्हटले की, तिचा दीर विनोद वाठोरे याने सदर तिच्या पतीसोबत नेहमी होत असलेल्या भांडणाच्या कारणाचा मनात राग धरला होता. त्यातूनच घरी कोणी नसताना फिर्यादी महिलेचा मुलगा प्रमोद (३) यास चाकू व विटाने जखमी करून ठार केल, या आशयाच्या फिर्यादीवरून आरोपी विनोद भीमराव वाठोरे याच्याविरूद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात कलम ३०२ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन तपासिक अंमलदार मोहन भानुदास डेरे यांनी सदर गुन्ह्याचा तपास करून जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोली येथे दोषारोप पत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायालयात या प्रकरणास सत्र खटला क्रमांक २०/२०१६ देण्यात आला. हे प्रकरण जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. शर्मा यांच्या समोर चालले. सरकार पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले.
२६ मार्च २०१९ रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. शर्मा यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून आरोपी विनोद भीमराव वाठोरे रा. शेगाव खोडके यास कलम ३०२ भादंविनुसार दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रूपये दंड ठोठावला आहे. तसेच दंड न भरल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सहायक सरकारी वकील एन. एस. मुटकुळे यांनी काम पाहिले.