संचालक पोले खुन प्रकरणातील मुख्य आरोपीला कर्नाटकातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 03:55 PM2018-12-03T15:55:20+5:302018-12-03T15:57:15+5:30
बाजार समिती संचालक सर्जेराव पोले (५५) यांचा एक जानेवारी १८ ला अपहरण करुन खुन करण्यात आला होता.
सेनगाव (हिंगोली ) : कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सर्जराव पोले खुन प्रकरणातील मुख्य आरोपी शिबुअण्णा पुजारी उर्फ शिबुअण्णा चन्ना अप्पा मढीवाल (२९, रा.हडीगुल ता. थिरथाहली जि.शिवमोगा, कर्नाटक ) यास रविवारी पोलीसांनी अटक केली. पुजारी हा मागील अकरा महिन्यांपासून फरार होता त्याला कर्नाटक येथील हडीगुल येथून पोलिसांनी ताब्यात घेतले.
तालुक्यातील वडहिवरा येथील माजी पंचायत समिती सदस्य व बाजार समिती संचालक सर्जेराव पोले (५५) यांचा एक जानेवारी १८ ला अपहरण करुन खुन करण्यात आला होता. जमिनीच्या वादातून अत्यंत शिताफीने सुपारी देवून करण्या आलेल्या खुन प्रकरणाने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. या खुनाचा सेनगाव पोलीसांनी ४८ तासात उलगडा केला होता. पंरतु, प्रमुख मारेकरी मात्र पोलीसांना मात्र सापडत नव्हते. तपास अधिकारी या खून प्रकरणातील आरोपी शरण येण्याची तर वाट पाहत नाही ना असा प्रश्न निर्माण झाला होता.
या खुन प्रकरणात पोलीसांनी रतन हरिभाऊ खटके ( रा.रामपुरी ता.पाथरी ) , विजय देवकर, हरीष बाबुराव मिरेकर, इम्रान युनूस शेख (सर्व रा.नाशिक ) या चार आरोपींना सुरवातीला अटक केली होती. त्यानंतर खुनाची सुपारी देणारा मुख्य आरोपी हरीभाऊ सातपुते ( रा नाशिक) यास तब्बल दहा महिन्यानंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले. तर दुसरा प्रमुख आरोपी शिबु आप्पा पुजारी ( रा.नाशिक ) हा फरार होता. पुजारीच्या मोबाईल क्रमांकावरून त्याचा ठावठीकाण शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. पुजारीला पोलिसांनी त्याचे कर्नाटक राज्यातील मूळ गाव हडीगुल येथून ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस निरीक्षक सरदार सिंह ठाकूर, पो.काँ.अनिल भारती, मंचक ढाकरे, प्रंशात नरडीले आदींनी केली.