शेतकऱ्यांनी उभारली दुधाची बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 12:31 AM2018-12-04T00:31:17+5:302018-12-04T00:31:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क आखाडा बाळापूर : शेतीला काहीतरी जोडधंदा उभा करुन उत्पन्न मिळवण्याची इच्छा प्रत्येक शेतकºयाची असते, मात्र त्यासाठी ...

 Milk market set up by farmers | शेतकऱ्यांनी उभारली दुधाची बाजारपेठ

शेतकऱ्यांनी उभारली दुधाची बाजारपेठ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
आखाडा बाळापूर : शेतीला काहीतरी जोडधंदा उभा करुन उत्पन्न मिळवण्याची इच्छा प्रत्येक शेतकºयाची असते, मात्र त्यासाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने अनेकांचा हिरमोड होतो. हे ग्रामीण भागातील वास्तव आहे. परंतु यावर मात करून कांडली येथील शेतकºयाने दूध विक्रीची बाजारपेठ बाळापुरात उभी केली आहे. ग्राहकांचा विश्वास मिळवला. अर्ध्या तासातच दूध विकून रोख रक्कम मिळत असल्याने आता परिसरातील शेतकरी या बाजारपेठेकडे आकर्षित झाले आहेत. नव्या बाजारपेठेचा फंडा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
शेती हा तोट्याचा व्यवसाय आहे. शेतकºयांना या नुकसानीतून बाहेर येण्यासाठी शेतीपूरक जोडधंदा करावा, असा सल्ला सर्वजण देतात. मात्र जोडधंदा करूनही दारिद्र्य दूर होईना हा सर्वांचाच अनुभव आहे. कळमनुरी तालुक्यातील शेतकरी यशवंत नरवाडे यांना सहा एकर शेती आहे. जोडधंदा म्हणून त्यांना म्हशी राखल्या दररोज ८ ते १० लिटर एकवेळ दूध येई. ते डेअरीला दूध देत, परंतु डेअरीवाले दूध फुटले या कारणाने आठवड्यातून एक दिवस तरी खाडा धरायचे त्यामुळे फायदा व्हायचा नाही. या बाबीला वैतागून त्यांनी बाळापुरातच दूध विकण्याचा निर्णय घेतला. शेवाळा रोड चौकात एका टेबलवर दुधाची कॅन ठेवून बसत. परंतु ग्राहक मिळेना. त्यांचे बसणे हा टिंगलीचा विषय बनला. अनेकवेळा दूध परत न्यावे लागले. हॉटेलवाले इतर दूध विक्रेते भाव पाडून मागायचे; पण या कशालाच दाद न देता त्यांनी नियमीत बसणे सुरू ठेवले. हळूहळू या निक्क्या दुधाची चर्चा सुरू झाली. पाण्याचा थेंबही न मिसळलेले दूध अशी ख्याती झाली. चांगले दूध मिळवण्यासाठी ग्राहक थेट चौकात येवू लागले. मोठ्या कष्टाने, धीराने ग्राहकांना विश्वास देवून ही बाजारपेठ निर्माण केली. हळूहळू ग्राहक वाढले. दूध कमी पडू लागल्याने इतर शेतकºयांना बोलावले. शेतकरी वाढले. आता बाळापूर, कांडली, बऊर, आडा येथील शेतकरी दूध विकतात. अर्ध्या तासातच १५० ते २०० लिटर दूध नगदीने विकले जाते. ५० रुपये लिटरप्रमाणे रोख पैसा काही मिनिटातच शेतकºयांच्या खिशात पडतो.
परिसरातील पाच ते सहा शेतकºयांच्या १५० ते २०० लिटर दुधाची दररोज विक्री होते. शेतकºयांना दररोज रोख पैसे यातून मिळतात. गेल्या दीड वर्षांपासून ही थेट बाजारपेठ तयार झाली. शेतकरी या बाजारपेठेकडे आकर्षित झाल्याने येथील डेअरी बंद करावी लागली आहे.
ही थेट बाजारपेठ जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे.
मला केवळ ६ एकर शेती आहे. १२ म्हशी, ८ बछडे आहेत. दररोज एक वेळा २० लिटर असे ४० लिटर दूध निघते. पण डेअरीवाल्यांची चलाखी आम्हाला नफा मिळू देत नव्हती. म्हणून थेट ग्राहकांशीच नाळ जोडली. २ ते ३ महिने नुकसान झाले. पण ग्राहकांना विश्वास पटला. आता रोज १ हजार २०० ते १ हजार ५०० रुपये रोख मिळतात. विश्वासावरच हा व्यवसाय उभारला. ग्राहकांना डेअरी किंवा पॅकिंगच्या दुधापेक्षा चांगले दूध मिळत असल्याने ग्राहक इकडे आकर्षित झाले आहेत, असे कांडली येथील सदर शेतकरी यशवंत नरवाडे यांनी सांगितले.
आधी डेअरीला जाणारे दूध शेतकरी आता या बाजारपेठेत विकत असल्याने डेअरीला दूध जाणे बंद झाले. शिवाय ग्राहकही इकडे वळल्याने डेअरीचा व्यवसाय बंद पडल्याचे दिसून येत आहे.

 

 


शेतीला काहीतरी जोडधंदा उभा करुन उत्पन्न मिळवण्याची इच्छा प्रत्येक शेतकऱ्याची असते, मात्र त्यासाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने अनेकांचा हिरमोड होतो.

Web Title:  Milk market set up by farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.