मोदकोत्सव! विघ्नहर्ता चिंतामणीच्या दर्शनासाठी लाखों भाविक हिंगोलीत दाखल
By रमेश वाबळे | Published: September 28, 2023 03:18 PM2023-09-28T15:18:39+5:302023-09-28T15:19:32+5:30
२८ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेपर्यंत ७० हजारांवर भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती संस्थांच्या वतीने देण्यात आली.
हिंगोली : नवसाला पावणारा गणपती म्हणून सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या येथील विघ्नहर्ता चिंतामणीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह परराज्यातून लाखों भाविक हिंगोलीत दाखल झाले आहेत. २८ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेपर्यंत ७० हजारांवर भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती संस्थांच्या वतीने देण्यात आली. तर हजारो भाविकांनी नवसाचा मोदकही घेतला.
हिंगोली शहरातील गड्डेपीर गल्ली भागातील विघ्नहर्ता चिंतामणीचा मोदकोत्सव अनंत चतुर्दशीच्या दिवशी साजरा होतो. यंदा मध्यरात्रीपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. महाराष्ट्रसह परराज्यातून चिंतामणीच्या दर्शनासाठी हिंगोलीत दाखल झाले आहेत. भाविकांची संख्या लक्षात घेता संस्थानच्या वतीने इंदिरा गांधी चौक, महावीर स्तंभ, मेडिकल लाईन, कपडा गल्ली, महात्मा गांधी चौक, गणपती चौक भागात भाविकांच्या फराळ पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच उन्हापासून संरक्षण व्हावे याकरिता गणपती चौकात भव्य मंडप उभारण्यात आला आहे. भाविकांच्या मदतीसाठी स्वयंसेवक येतात करण्यात आले आहेत तसेच पोलिसांचाही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भाविकांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी बॅरिकेट्स उभारण्यात आले आहेत. दुपारी १ वाजेपर्यंत ७० हजारांवर भाविकांनी विघ्नहर्ता चिंतामणीचे दर्शन घेतले. तसेच हजारो भाविकांनी नवसाचा मोदकही घेतला.
दीड लाख नवसाच्या मोदकांचे वाटप...
नवसाला पावणारा गणपती म्हणून विघ्नहर्ता चिंतामणी सर्वदूर प्रसिद्ध आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी या ठिकाणाहून लाखावर भाविक नवसाचा मोदक नेतात. यंदा संस्थानाच्या वतीने दीड लाख नवसाचे मोदक तयार करण्यात आले आहेत.