नामदेव महाराज मंदिराचे कलशारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 01:09 AM2019-02-02T01:09:09+5:302019-02-02T01:09:47+5:30
संत शिरोमणी संत नामदेव महाराज यांच्या जन्मगावी नर्सीत संत नामदेव महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याला ऐतिहासिक गर्दी झाली होती. अगदी थाटात व डोळ्याचे पारणे फेडणारा हा सोहळा झाला. मागील सप्ताहाभर येथे यानिनिमित्त विविध कार्यक्रमही शांततेत पार पडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नर्सी नामदेव : संत शिरोमणी संत नामदेव महाराज यांच्या जन्मगावी नर्सीत संत नामदेव महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याला ऐतिहासिक गर्दी झाली होती. अगदी थाटात व डोळ्याचे पारणे फेडणारा हा सोहळा झाला. मागील सप्ताहाभर येथे यानिनिमित्त विविध कार्यक्रमही शांततेत पार पडले.
श्रीक्षेत्र नर्सी नामदेव येथे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे भव्य व देखणे मंदिर उभारले आहे. आज सकाळी ९ वाजता विधीवत पूजा व आरती करून व नामदेव जनाबाई यांच्या जयघोषाने, पंचक्रोशीतील लाखो भाविकांच्या साक्षीने कलश मंदिराव चढविला. यासाठी हिंगोली, परभणी, नांदेड, वाशिम, बुलढाणा, रिसोड, जिंतूर तसेच राज्य परराज्यातील लाखोंच्या संख्येने भाविक आले होते. कलशारोहण सोहळा शांततामय व मोठ्या उत्साहात भक्तीमय वातावरणात पार पडला.
कलशारोहण सोहळ्यास लोकेश चैतन्य स्वामी, बालयोगी सदानंद महाराज, आत्मानंदजी गिरी महाराज, कमलदास महाराज, रामभाऊ महाराज, काशिराम महाराज, आ.तान्हाजीराव मुटकुळे, आ.रामराव वडकुते, आ.हेमंत पाटील, आ.जयप्रकाश मुंदडा, माजी खा.सुभाष वानखेडे, माजी आ.बळीराम पाटील कोटकर, मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष रामेश्वर शिंदे, अॅड.के.के.शिंदे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, संतोष बांगर, दिलीप बांगर, राम कदम, धर्मदाय आयुक्त रवींद्र धायतडक, डॉ.हरिशचंद्र सिंह, उद्धवराव गायकवाड, आनंद जाधव, आनंद जाधव, विठ्ठल वाशिमकर, सतीश विडोळकर, दाजीबा पाटील, शाहूराव देशमुख, नारायण देशमुख, डिगांबर देशमुख, कुंडलिकराव घुले, उतमराव लाभाटे, नारायण खेडेकर, गिरीश वरूडकर, माधव पवार, त्र्यंबकराव तावरे, दादाराव महाराज डिग्रसकर, मदन लोथे, किसनराव गावंडे, पानबुडे, डॉ. रमेश शिंदे आदी हजर होते.
या सोहळ्यासाठी वारकऱ्यांसह परिसरातील भजनी मंडळीही मोठ्या संख्येने दाखल झाली होती. अनेक भाविक येथीलही नियमित वारी करतात. या सप्ताह व कलशारोहणाच्या निमित्ताने अशा पायी वारकºयांचे जत्थेच्या जत्थे दाखल होताना दिसत होते.
मंदिर जिर्णोद्धार समितीने चार ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली होती. पोलीस प्रशासन व स्वयंसेवकांच्या मदतीने हे नियोजन करण्यात आले. कार्यक्रम झाल्यानंतर हिंगोलीकडे व सेनगावकडे जाणाºया दुतर्फा दोन ते अडीच किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी पोलीस प्रशासनाने भाविकांना वाट मोकळी करून दिली. यशस्वीतेसाठी मंदिर जिर्णोद्धार समिती, संत नामदेव मंदिर संस्थान, नर्सी नामदेव येथील ग्रामस्थ व हजारो स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. लाखो भाविकांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात सोहळा पार पडला.
दरम्यान, गर्दीचा फायदा घेत दागिने चोरीच्या व पेट्रोल चोरीच्या घटनाही घडल्या. यात ग्रामीण भागातील अनेक महिलांना फटका बसला. मात्र अनेकांनी त्याची तक्रार दाखल करणे टाळले. विचारपूस करताना मात्र अनेकजण आढळत होते. पेट्रोल चोरीला गेल्याने काहींना गाड्या ढकलण्याची वेळ आली होती.
कलशारोहण सोहळ्याला होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अब्दुल गणी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला. पोलीस बंदोबस्तादरम्यान २ पोलीस निरीक्षक, २ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ३ पोलीस उपनिरीक्षक, ४५ पोलीस कर्मचारी, १० वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी व १ एसआरपीएफ प्लाटून असा तगडा बंदोबस्त होता.