हिंगोली : निसर्गशाळेच्या सहाव्या आणि सातव्या तुकडीचे उद्घाटन हभप अविनाश महाराज भारती यांच्या हस्ते नुकतेच झाले. यावेळी महाराष्ट्रातील ३१ जिल्हे तसेच गोवा, आंध्र प्रदेशासह सौदी अरेबियातून मराठी भाषिक विद्यार्थ्यांनी शाळेत सहभाग घेतला. कवी भारती यांनी संतांच्या काव्याचे दाखले देत निसर्गाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
'एक मूल तीस झाडे' या अभियानांतर्गत निसर्गाच्या शाळेची सुरुवात १ मे २०२१ रोजी झाली. या
शाळेचा हेतू मुलांना निसर्गाची माहिती देणे, हा असल्याने शाळा महाराष्ट्रभर पोहोचली. पालघर, मुंबई, नाशिक, रायगड, ठाणे, नवी मुंबई, नागपूरसह महाराष्ट्रातील ३१ जिल्ह्यांत शाळा पोहोचली आहे. गोव्यातील तीन भागांमध्ये, तर आंध्रातील हैदराबाद व सौदी अरेबियातील आर्यन दळवी आणि गौरवी दळवी या दोन विद्यार्थ्यांचा प्रवेश शाळेत नुकताच झाला आहे. विशेष म्हणजे प्रवेश घेतलेल्या दोन विद्यार्थ्यांची आई ही सौदी अरेबियामध्ये मराठी शिक्षिका असून निसर्गाची माहिती त्या विद्यार्थ्यांना देतात.
१४ वर्षांखालील ८०० च्यावर विद्यार्थी या शाळेत शिकत आहेत. १४ वर्षांखालील मुलांच्या अंगी शेती, माती, झाड, पाणी, एकूणच निसर्गाविषयी जाणिवा-नेणिवा तयार होऊन निष्ठा निर्माण होण्यासाठी ही शाळा काम करत आहे. मुलांनी निरोगी आयुष्य जगण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जाणे गरजेचे आहे, हाच या शाळेचा मुख्य उद्देश आहे.
निसर्गशाळा आठवड्यातून एक दिवस, एक घंटा असते. बाकीचे दिवस कृतीसाठी राखीव आहेत. शाळेतील पहिल्या पाठांतर्गत ३०० विद्यार्थी घरच्याघरी फळझाडांची रोपवाटिका तयार करायला लागली आहेत. नियोजित अभ्यासक्रम, अनेक उपक्रम, प्रकल्प निसर्गशाळेत आहेत. याचबरोबर परीक्षा, अभ्यासक्रम, प्रमाणपत्र, बक्षिसे शाळेत दिली जात आहेत. तसेच आठवड्याला उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार दिले जात आहेत. महाराष्ट्रातील पन्नासच्यावर तज्ज्ञ मार्गदर्शक या शाळेत मार्गदर्शन करतात. प्रा. ज्ञानोबा ढगे, रवी देशमुख, बालासाहेब राऊत, प्रेमानंद शिंदे, बाळू बुधवंत, श्याम राऊत, गोविंद दळवी, विलास जाधव, अनिता गायकवाड, सदा वडजे, रतन आडे, संजय मुसळे, प्रा. रेवती गव्हाणे 'एक मूल तीस झाडे' अभियानाचे शिक्षकमित्र शाळेला मदत करत आहेत.
शाळा मुलांना भविष्यासाठी घडवते
कोरोना महामारीच्या काळात पालकांसह मुले भविष्याविषयी चिंतित आहेत. पद, पैसा, प्रतिष्ठेच्या पुढे जाऊन
निरोगी जगणे महत्त्वाचे झाले आहे. शेती, माती, झाड, पाणी, एकूणच निसर्गाला समजून घेऊन निसर्गाचे जतन करत योग्य उपभोग घेतला तरच निरोगी जगता येते, हे आता सर्वांना समजले आहे.
अण्णा जगताप, प्रमुख, निसर्गाची शाळा