निवडणुकीसाठी राष्ट्रीयकृत बँकेचे नवीन खाते असणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:26 AM2020-12-24T04:26:34+5:302020-12-24T04:26:34+5:30
ग्रामपंचायत निवडणूकीसाठी उमेदवाराला ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रत तसेच उमेदवाराला ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत उमेदवाराचे नाव ज्या पानावर आहे त्या ...
ग्रामपंचायत निवडणूकीसाठी उमेदवाराला ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रत तसेच उमेदवाराला ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत उमेदवाराचे नाव ज्या पानावर आहे त्या पानाची सत्यप्रत, राखीव प्रवर्गासाठी १०० रुपये तर सर्वसाधारण उमेदवारांसाठी ५०० रुपये अनामत रक्कम द्यावी लागणार आहे. दोन पेक्षा अधिक अपत्ये नसल्याबाबतचे उमेदवाराचे स्वयंघोषणापत्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र नसल्यास जात वैधता प्रमाणपत्र समितीकडे सादर केलेल्या प्रस्तावाची पोहोच पावती नामनिर्देशन पत्रासोबत घ्यावी लागणार आहे. जातवैधता प्रमाणपत्र निवडून आल्यानंतर ६ महिन्यांच्या आत सादर करण्याचे हमीपत्र, दैनिक खर्च, एकूण खर्च विहित मुदतीत सादर करण्याबाबतचे हमीपत्र, २३ डिसेंबर २०२० रोजी २१ वर्ष पूर्ण होत असल्याबाबतचा पुरावा, रहिवासी पुरावा, ओळखपत्र पुरावा, वयाचा पुरावा, तसेच ग्रामपंचायतकडून उमेदवारांनी ग्रामपंचायतीचे बेबाकी तसेच थकबाकीदार नसल्याचे प्रमाणपत्र, ग्रामपंचायतीचे ठेकेदार नसल्याचे शपथपत्र, शौचालय व तो वापरात असल्याचे शपथपत्र आदी कागदपत्रे उमेदवारांना नामनिर्देशन पत्रासोबत द्यावी लागणार आहेत. त्यासाठी
उमेदवार कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यामध्ये गुंतलेले दिसत आहेत. सध्या ग्रामीण भागात निवडणुकीचेच वारे वाहत असून निवडणुकीच्या गप्पा रंगत आहेत. पॅनल प्रमुखही कोणता उमेदवार आपल्यासाठी चांगला राहिल व कोण निवडून येईल याची चाचपणी करत आहेत. सध्या थंडीचा जोर वाढला असून सकाळ - संध्याकाळ ग्रामीण भागात शेकोट्या पेटत आहेत. या शेकोट्याजवळ गावांतील निवडणुकीच्या गप्पा चांगल्यात रंगत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यास २३ डिसेंबरपासून सुरूवात हाेणार असल्याने राजकीय चर्चेला वेग आला आहे.