समृद्ध, शक्तिशाली राष्ट्र उभारणीसाठी मातृभाषेतून शिक्षणाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:51 AM2021-02-05T07:51:59+5:302021-02-05T07:51:59+5:30
हिंगोली : समृद्ध आणि शक्तिशाली राष्ट्र उभारणीसाठी मातृभाषेतून शिक्षणाची गरज असून, त्यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुनीश्री ...
हिंगोली : समृद्ध आणि शक्तिशाली राष्ट्र उभारणीसाठी मातृभाषेतून शिक्षणाची गरज असून, त्यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुनीश्री १०८ अक्षय सागर महाराज यांनी केले.
३० जानेवारी रोजी येथील जिल्हा परिषद शाळा गणेशवाडी येथे वात्सल्यमूर्ती मुनीश्री १०८ अक्षय सागर महाराज यांचे प्रवचन झाले. यावेळी शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, नाभिराज मास्ट, डॉ. नितीन साकळे, आशिष पिंगळकर, प्रगतिशील शेतकरी किशोर मास्ट, केंद्रप्रमुख कुलदीप मास्ट, मुख्याध्यापक निर्मला चौधरी, भास्कर लांडगे, प्रणीता देवकर, सीमा गवळी यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थी जीवन आणि व्यक्तिमत्त्व विकास या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.
यावेळी मुनीश्री अक्षय सागर महाराज म्हणाले, विद्यार्थी अवस्था खऱ्या आर्थाने जीवनाचा पाया आहे. पाया मजबूत असेल तर इमारत चांगली उभी राहाते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण देऊन विद्यार्थी जीवनाचा पाया मजबूत केला पाहिजे. मातृभाषेतून शिक्षण या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांकडे जिद्द, चिकाटी असली पाहिजे. केवळ परिस्थितीचा बाऊ करण्यापेक्षा परिस्थितीवर मात करून त्यातून मार्ग काढता आला पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्द व जिज्ञासूवृत्ती जोपासणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांवर आई, वडील अपेक्षांचे ओझे लादत आहेत. मात्र त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात त्यांना करिअर करण्याची संधी दिली पाहिजे. त्यांच्यातील कलागुणांना वाव दिला पाहिजे. त्यांच्या आवडत्या क्षेत्रातूनच विद्यार्थी पुढील काळात आदर्श नागरिक होऊ शकतील. शिक्षण हे आमचे साध्य नाही तर साधन आहे याकडे पालकांनीही लक्ष दिले पाहिजे. सध्या देशात इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याचा कल प्रचंड वाढला आहे. मात्र त्यामुळे देशाचे प्रचंड नुकसान होत असून, त्याकडे सर्वांनीच गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मुनीश्री अक्षय सागर महाराज यांनी सांगितले.