बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 11:24 PM2019-01-08T23:24:59+5:302019-01-08T23:26:54+5:30
निराधार योजनेची लाभ घेण्यासाठी काढलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र खोटे व बनावट असल्याचे तपासात आढळून आल्याने १३ जणांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : निराधार योजनेची लाभ घेण्यासाठी काढलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र खोटे व बनावट असल्याचे तपासात आढळून आल्याने १३ जणांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी दिली.
तालुक्यातील १३ जणांनी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी २०१७-१८ या वर्षाचे खोटे व बनावटी उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढून ते निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्तावासोबत तहसील कार्यालयात सादर केले. या उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची तपासणी केली असता ते बनावट असल्याचे आढळून आले आहे. निराधारांच्या प्रस्तावासोबत जोडलेल्या उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची तपासणी नायब तहसीलदारामार्फत करण्यात आली असता ते खोटे व बनावटी असल्याचे आढळून आले. तहसील कार्यालयामार्फत देण्यात आलेल्या उत्पन्नाच्या प्रमाणपत्रावरील बारकोड क्रमांक व १३ जणांनी प्रस्तावासोबत सादर केलेल्या उत्पन्नाच्या प्रमाणपत्रावरील बारकोड क्रमांक जुळून आला नसल्याचे आढळून आले. त्यामुळे निराधारांच्या संचिकेसोबत जोडण्यात आलेले बनावट उत्पन्नाचे प्रमाणपत्र कोणत्या व्यक्तीकडून तयार करून घेण्यात आले? कोणामार्फत काढले, याचा खुलासा सादर करण्याचे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे.
निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी सादर केलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून देण्यात आलेले नाही. त्यामुळे हे उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे बनावट व खोटे असल्याचे दिसून येते. त्यामुळे आपणाविरूद्ध भारतीय दंड संहिता/८६० कलम ४१९, ४२०, ४६५४६८, ४७१, ४०९ व इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्ट सन २००० चे कलम ४३ (१) ४६ (१) ६६ अन्वये गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये, याबाबतचा खुलासा दोन दिवसांच्या आत सादर करण्यात यावा नसता आपणाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही नोटिसीत नमूद आहे.
१३ पैकी तिघांनी सादर केले खुलासे
तहसीलदारांनी १३ जणांना ३ जानेवारी रोजी नोटिसा बजावल्या असून, त्यापैकी तिघांनी खुलासे सादर केलेले आहेत. पार्वतीबाई मारोती गायकवाड, शांताबाई अवचार, तुळसाबाई केजगीर (तिघे रा. येडशी), किसन पाईकराव (शेनोडी), अनूसयाबाई चौतमल (रा.चाफनाथ), नर्मदाबाई असोले, तान्हुबाई असोले, वत्सलाबाई असोले (तिघे रा.असोलवाडी), शांताबाई चौतमल, बाबूराव चौतमल (रा. चाफनाथ), भगवान कांबळे, मंगलाबाई कांबळे (दोघे रा. खरवड) या १३ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, उत्पन्नाचे खोटे व बनावट प्रमाणपत्र काढून देणारा कोण आहे, याची तपासणी करण्यात येत असल्याचे तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी सांगितले.