हिंगोली : ‘डेल्टा प्लस’मुळे राज्यात पुन्हा निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील हॉटेल्स बंद राहणार असून, होम डिलिव्हरी सुरू राहणार आहे. परिणामी नागरिकांना हॉटेलात जाऊन चमचमीत पदार्थ खाता येणार नाहीत.
हिंगोली मराठवाड्यात लहान जिल्हा आहे. हिंगोली शहरात सद्य:स्थितीत लहान-मोठे हॉटेल्स ५५ आहेत, तर हॉटेलवर अवलंबून असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ही २७० जवळपास आहे. या अगोदर कोरोना महामारीमुळे हॉटेल व्यावसायिक कमालीचे त्रस्त झाले असून त्यांचा व्यावसायही डबघाईस आला आहे. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोलावून आणावे लागत आहे. कोरोना महामारी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार हॉटेल अधूनमधून बंद ठेवावे लागत असल्यामुळे काम करणारे कर्मचारी आपापल्या गावी निघून गेले आहेत. काही मोजकेच हॉटेल कामगार आता शहरात राहिले आहेत. तेही सायंकाळचे पाच वाजले की काम अर्धवट ठेवूनच गावी जाण्याची तयारी करीत आहेत.
हॉटेल व्यावसाय पुन्हा कधी उभा राहणार ?
गत दीड वर्षापासून कोरोना महामारीमुळे हॉटेल व्यावसाय डबघाईस आला आहे. हॉटेलमध्ये काम करण्यासाठी कामगार मिळेना झाले आहेत. कोरोना महामारीनंतर आता डेल्टा प्लस हा आजार पुढे आल्यामुळे परत हॉटेल व्यावसायिक अडचणीत येणार आहे, असे एका हाॅटेल चालकाने सांगितले.
बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सरकारी अथवा खासगी नोकरीही मिळेना झाली आहे. घर संसार चालविण्यासाठी किरायाने हॉटेल सुरू केली. परंतु, कोरोना महामारीमुळे सद्य:स्थितीतही बंदच ठेवावी लागत आहेत. हॉटेल किराया मात्र भरावा लागत आहे. याचबरोबर हॉटेलमध्ये काम करण्यासाठी कामगारांना बोलावून आणावे लागत आहे, असे हॉटेल व्यावसायिकाने सांगितले.
सोमवार ते शुक्रवार ५० टक्के क्षमता राहणार
डेल्टा प्लसमुळे राज्यात पुन्हा निर्बंध घालण्यात आले आहेत. हॉटेल व्यावसाय सोमवार ते शुक्रवारपर्यंत चालू राहणार आहे. या काळात जिल्हा प्रशासनाचे जे आदेश येतील त्याप्रमाणे व्यवसाय करावा लागणार आहे. हॉटेलमध्ये जास्तीचे कर्मचारी कामाला ठेवता येणार नाहीत. हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी मास्क घालत आहेत का? सॅनिटायझरचा वेळोवेळी वापर करत आहेत का? सामाजिक अंतराचे भान ठेवत आहेत का? हॉटेलमध्ये व परिसरात साफसफाई नियमित होत आहे का? याचीही चाचपणी केली जाणार आहे.
हॉटेल कर्मचाऱ्यांचे तर आणखी हाल....
गत दीड वर्षापासून हॉटेल व्यवसाय बंद राहत असल्यामुळे हाताला काम मिळत नाही. घरात नाही म्हटले तरी चार ते पाच सदस्य आहेत. काम केले तरच पैसा मिळतो. परंतु, आजमितीस हॉटेलचालक कमी प्रमाणात कामगारांना बोलावत आहेत, त्यामुळे हाताला काम मिळत नाही, असे एका कामगाराने सांगितले.
कोरोना महामारीनंतर आता ‘डेल्टा प्लस’ या आजाराने डोके वर काढले आहे. त्यामुळे आमच्यासारख्या कामगारांवर पुन्हा उपासमार येणार आहे. यापुढे शनिवार आणि रविवार हॉटेल बंद राहणार असल्यामुळे कामगारांवर घरी बसण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. हॉटेल बंद राहिल्यास शासनाने कामगारांना मोफत धान्य द्यावे, अशीही व्यथा एका कामगाराने मांडली.