लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : वसमतच्या तत्कालीन तहसीलदार सुरेखा नांदे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्याचे आदेश वसमत न्यायालयाने दिले आहेत. त्यावरून वसमत पोलिसांत गुन्हाही दाखल झाला आहे.सन २०१६-१७ मध्ये दुष्काळी निवारण मदत निधी तहसील कार्यालयात प्राप्त झाला होता. २ लाख ८३ हजार रुपयांचा निधी संबंधित तलाठ्याच्या खात्यावर जमा करण्याऐवजी तहसीलदारांनी लिपिक खंदारे यांच्या नावावर जमा केला होता. या प्रकरणाची चौकशी झाली आणि तहसीलदार नांदे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. रक्कम वसुलीचीही कारवाई झाली. नांदे सध्या नायगाव येथे तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत.याप्रकरणी अर्धापूर येथील माहिती अधिकार कार्यकर्ता शेख जाकेर यांनी अॅड. इद्रीस कादरी यांच्या माध्यमातून वसमत न्यायालयात प्रकरण दाखल केले होते व गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती. वसमत न्यायालयाने कलम १५६ (३) अन्वये तहसीलदार नांदे व लिपिक खंदारे यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले.याप्रकरणी तहसीलदार नांदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणात यापूर्वीच चौकशी होवून कारवाई झालेली आहे. वसुलीही करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता पुन्हा त्याच प्रकरणात कारवाई होणार असेल तर एकाच प्रकरणात ही दुहेरी शिक्षा ठरेल, असे त्यांनी सांगितले.दरम्यान, दुष्काळ निवारण निधीच्या गैरव्यवहार प्रकरणात तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई झाली. मात्र ज्या लिपिकाच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली त्याच्यावर मात्र महसूल विभागाने कारवाई केलेली नाही, हे विशेष. या प्रकरणात सदर लिपिक मास्टर मार्इंड म्हणून चर्चेत आला होता.गुन्हा दाखल : पुन्हा प्रकरण चर्चेतदरम्यान, या प्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशान्वये फिर्यादी शेख जाकेर शेख सगीर रा. अर्धापूर यांच्या तक्रारीवरून तत्कालीन तहसीलदार सुरेखा नांदे, विद्यमान लिपिक भास्कर खंदारे यांच्या विरोधात फसवणुकीच्या कलमासह विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.या प्रकरणाचा तपास पोनि उदयसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शेख आजम करीत आहेत.
तहसीलदार नांदे यांच्यावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:21 AM