हिंगोली: हिंगोली : विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठी ५ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन मतदार नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर आलेले अर्ज मात्र समाविष्ट करता येणार नाहीत, अशी माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जयवंशी म्हणाले, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. यासाठी १ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. यात १६ हजार २७६ एवढे मतदार आहेत. ३९ मतदान केंद्रांची स्थापना केली आहे. तर आता प्रचारकार्य सुरू होणार असल्याने उमेदवारांना सभा, पदयात्रा यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. तर उमेदवारासह पाचपेक्षा जास्त लोक एकावेळी प्रचारासाठी फिरू शकणार नाहीत. कोरोनामुळे ही खबरदारी घ्यावी लागणार आहे. सर्व तालुक्यात तहसीलदारांच्या नियंत्रणाखाली आदर्श आचारसंहिता कक्ष, भरारी पथक, व्हिडीओ संनिरीक्षण पथक, चित्रीकरण पथक स्थापन केले जाईल.
यासाठी जिल्ह्यात १२ क्षेत्रीय अधिकारी नेमले जातील. मतदान केंद्रावर प्रत्येकी १ व राखीव ९ असे ४८ जणांची नेमणूक केली. तर १४४ कर्मचारी नेमले आहेत. ४८ वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर डॉक्टरांसह आरोग्य पथक राहणार आहे. तेे येणाऱ्या प्रत्येक मतदाराचे तापमान, ऑक्सिजन लेव्हल अथवा कोरोनासदृश्य काही लक्षणे तर नाहीत, याची तपासणी करणार आहेत.
कोरोनामुळे ही घ्यावी लागेल काळजीही निवडणूक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असल्याने आरोग्य तपासणीत कोणी कोरोना संशयित वाटल्यास त्याला पीपीई कीट परिधान करून मतदानाचा हक्क बजावावा लागणार आहे. तर सामाजिक अंतर, सॅनिटायझर, मास्क अनिवार्य राहणार आहे. या मतदान केंद्रांची त्या त्या तालुका विभागप्रमुखांनी तपासणी करून दुरुस्तीची गरज असल्यास बांधकाम विभागाकडून ती करून घ्यायची आहे. तर अशा ठिकाणी सर्व किमान मूलभूत सोयीसुविधा, दिव्यांगांसाठी विशेष व्यवस्था आदी बाबींसाठी सूचना दिल्या आहेत, असेही जयवंशी यांनी सांगितले.