नवीन सभापती निवडीवरून श्रेष्ठींसमोर पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:20 AM2021-07-04T04:20:34+5:302021-07-04T04:20:34+5:30

हिंगोली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या रत्नमाला चव्हाण यांच्यावर अविश्वास आणल्याने याच पक्षाला सभापतीपद मिळेल, असे अपेक्षित आहे. जि.प.च्या पहिल्या ...

Pech in front of Shrestha from the election of new Speaker | नवीन सभापती निवडीवरून श्रेष्ठींसमोर पेच

नवीन सभापती निवडीवरून श्रेष्ठींसमोर पेच

Next

हिंगोली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या रत्नमाला चव्हाण यांच्यावर अविश्वास आणल्याने याच पक्षाला सभापतीपद मिळेल, असे अपेक्षित आहे. जि.प.च्या पहिल्या टर्ममध्ये शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये सगळे काही सुरळीत चालले. पदाधिकाऱ्यांच्याही काही अंतर्गत कुरबुरीचा प्रश्न कधी समोर आला नाही. दुसऱ्या टर्मची सुरुवातच राजकीय वादाने झाली. शिवसेनेचे आ.संतोष बांगर यांनी राष्ट्रवादीचे जयप्रकाश दांडेगावकर यांच्याशी संधान बांधून स्व. खा. राजीव सातव गटाला जिल्हा परिषदेत सत्तेबाहेर केले. यात माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या गटाला मात्र सामावून घेतले. यात काँग्रेसचे दुहेरी नुकसान झाले होते. शिक्षण व अर्थ आणि समाजकल्याण ही महत्त्वाची खाती हातची गेली. यात समाजकल्याण सेनेने बळकावले. तर सेना व भाजपच्या ताकदीवर सभापतीपदी बसलेल्या चव्हाण यांनी शिक्षणवर डल्ला मारला. त्यानंतर कृषीसारखे पद देऊन गोरेगावकर गटाची बोळवण झाली. त्यामुळे चव्हाण यांच्यावर नाराजी वाढली. नंतर अंतर्गतही वादात चव्हाण यांचे बिनसतच गेले. त्यामुळे त्यांच्यावर अविश्वास पारित झाला. अविश्वासाच्या वेळी सातव यांचा गटही पदाधिकाऱ्यांच्या सोबत राहिला.

जि.प.त वरकरणी सगळे राजकारण सोपे दिसत असले तरीही आतून मात्र आग धुमसत आहे. त्याचा भडका उडू नये, यासाठी निधी वाटपात झुकते माप देण्याचा फंडा समोर आला. मात्र सभापती निवडीच्या तारखेनंतर पुन्हा गट तटाच्या भिंती उभ्या राहात आहेत. कोण सोयीचे व कोण गैरसोयीचे याचे आराखडे बांधले जात आहेत. सदस्य व नेते यांच्यात एकवाक्यता होण्याची चिन्हे नाहीत. मागच्या वेळी सभापती निवडीत नेत्यांचा आदेश झुगारणारे कमी नव्हते. आता तीच गत होते की नेत्यांची सरशी? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

चर्चेतील नावे अन् विरोध

जी नावे चर्चेत आहेत, त्यातील काहींना आजी तर काहींना माजी आमदारांचा विरोध आहे. त्यामुळे हा पेच कसा सुटणार? हा प्रश्न आहे. संजय कावरखे, यशोदा संजय दराडे, रिता दळवी यांची नावे चर्चेत आहेत. मात्र विरोधाची धार कायम राहिली तर कुठे आशामती सहिजराव यांच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडते की काय? असे दिसू लागले आहे.

फिल्डिंग लावणे सुरू

सभापती निवडीची तारीख जाहीर होईपर्यंत कोणी या पदाबाबत बोलायलाही तयार नव्हते. तारीख जाहीर होताच फिल्डिंग लावणे सुरू झाले आहे. त्यातच वेगवेगळे निकष लावून मी कसा पात्र, हे सांगितले जात आहे. सहा ते आठ महिन्यांचा हा सभापती कोण ठरणार? हे लवकरच समोर येणार आहे.

Web Title: Pech in front of Shrestha from the election of new Speaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.