पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याऐवजी वाढूच लागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:52 AM2021-02-05T07:52:04+5:302021-02-05T07:52:04+5:30
डिसेंबर २०२०मध्ये पेट्रोल २७ पैसे, तर डिझेल २८ पैशांनी महागले होते. सद्य:स्थितीत पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने वाहन चालकांना ...
डिसेंबर २०२०मध्ये पेट्रोल २७ पैसे, तर डिझेल २८ पैशांनी महागले होते. सद्य:स्थितीत पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने वाहन चालकांना वाहने चालविणे परवडेना झाले आहे. २७ जानेवारीपासून जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणच्या शाळा सुरू झाल्या असल्या तरी अजूनही काही शाळा सुरू होणे बाकी आहे. दुसरीकडे पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्याने विद्यार्थ्यांना शाळेत कसे न्यावे? असा प्रश्न स्कूल व्हॅन चालकांना सतावू लागला आहे. दुसरीकडे अशा महागाईच्या परिस्थितीत घर कसे चालवावे, हे मोठे आव्हान त्यांच्यापुढे उभे ठाकले आहे.
कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी सुशिक्षितांनी चारचाकी वाहने विकत घेतलेली आहेत. परंतु, डिसेंबर महिन्यापासून तेल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलचे दर वाढविल्याने चारचाकी व दोन चाकी वाहने अनेकांनी घरीच ठेवणे पसंत केले आहे.
आधीच कोरोना आजारामुळे सात-आठ महिने घरीच बसून राहावे लागले. कोरोनामुळे सर्वांवरच उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. सद्य:स्थितीत मुलांना ने-आण करणेही कठीण झाले आहे. त्यामुळे कुटुंबाचा गाडा कसा हाकावा? असा मोठा प्रश्न शाळेच्या वाहनचालकांना पडला आहे.
केंद्र व राज्य शासनाने पेट्रोल व डिझेल दरवाढ कमी करून हातावर पोट असणाऱ्यांची उपासमार थांबवावी, अशी मागणी मुरली कल्याणकर (हिंगोली), पांडुरंग कऱ्हाळे (डिग्रस), भगवान बांगर (हिंगोली), उतमराव हरण (सावरखेडा), बद्रीनाथ घुगे (सेलसुरा), अरविंद गडदे (दुधाळा), सय्यद रफीक (हिप्परखेड), अनिल सानप (गुट्टे बेलोरा), गजानन घुगे (अंभेरी), रामदास जगताप (इसापूर) यांनी केली आहे.
पेट्रोल दरवाढीचा जास्त फटका दुचाकीवर व्यवसाय करणाऱ्यांना बसत आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसाय करणारे, कटलरी साहित्य विकणारे, भाजीपाला विक्रेत्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. मिळालेला मुनाफाही पेट्रोलमध्येच घालावा लागत असल्याने आता हा व्यवसाय करावा की नाही, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे.
पाच दिवसांतील पेट्रोलचा दर
२५ जानेवारी रोजी पेट्रोल ९३ रुपये ८४ पैसे, २६ रोजी ९३ रुपये ६० पैसे, २७ ते ३० जानेवारी रोेजी ९३ रुपये ८४ पैसे या दराने विक्री होत होते. तर २५ जानेवारी रोजी डिझेल ८२ रुपये ३९ पैसे, २६ रोजी ८२ रुपये ७५ पैसे, २७ ते ३० जानेवारी रोजी ८३ रुपये १ पैसा या दराने विक्री झाले.
केंद्र व राज्याने पेट्रोलवरील दर कमी केले तर सर्वकाही नियंत्रणात राहू शकते. दुसरीकडे वाहनचालकांना वाहने चालविणेही सोयीचे होऊ शकते.
— राजू खुराणा, पेट्रोलपंप, हिंगोली