कळमनुरी (जि. हिंगोली) : औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील एका मोबाईल टॉवरचे साहित्य चोरून पळणाऱ्या चोरट्यांना ग्रामस्थांच्या मदतीने पाठलाग करून पकडले. ही घटना बोल्डा शिवारात १४ नोव्हेंबर रोजी रात्री ७.३० ते ८ वाजेच्या दरम्यान घडली. बालाजी प्रकाश बुधवंत (रा. जांब, ता. जिंतूर) व रुपेश केरबा खंदारे (रा. वाई, ता. वसमत) अशी आरोपींची नावे आहेत.
पिंपळदरी येथील इंडस कंपनीच्या मोबाईल टॉवरचे २ हजार रूपये किंमतीचे १० मीटर कॉपर पॉवर केबल, ८ हजार रूपये किमतीच्या अमरराजा कंपनीच्या सहा बॅटऱ्या, ७ हजार रूपये किमतीचे जनरेटर व १० लिटर डिझेल असा एकूण ५० हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने काढला होता. त्याचवेळीकंपनीच्या टॉवरमधील साहित्य काढल्याचा संदेश कंपनीला गेला. कंपनीने तत्काळ पिंपळदरी येथील ग्रामस्थांना मोबाईलवरुन ही माहिती दिली. दोन चोरटे हे सर्व साहित्य स्कॉर्पिओ क्र. एमएच ०६ टी. ७५१८ मध्ये घेऊन जात असल्याचे आढळून आले.
ग्रामस्थांनी ताबडतोब ही माहिती कळमनुरी पोलिसांना दिली. फौजदार ज्ञानोबा मुलगीर, सूर्यवंशी, रिठे, चाटसे, नलवार, शिंदे हे घटनास्थळी आले. त्यांनी या वाहनाचा पाठलाग सुरू केला. चोरट्यांचे वाहन पुढे व पोलिसांची गाडी मागे असे दृश्य काही कि.मी. पर्यंत सुरू होते. बोल्डा शिवाराज शेवटी पोलिसांनी बालाजी बुधवंत व रुपेश खंदारे या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या.
आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यतापकडलेल्या दोन्ही आरोपींकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. दोघांनाही औंढा नागनाथ येथील न्यायालयासमोर हजर केले, असता, त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक रंजीत भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना. पी.एम. चाटसे करीत आहेत.