हिंगोली: जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शिक्षण विभागाच्या वतीने सुरू असलेल्या शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षणला स्थगिती द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्याकडे केली आहे.
शिक्षण विभागाच्या वतीने बैठक घेऊन शाळाबाह्य विद्यार्थी शोधण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. जिल्ह्यात त्यानुसार प्रत्येकांच्या घरी जाऊन शाळाबाह्य विद्यार्थी शोधण्याचे काम सुरू आहे. मात्र जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने या कामास स्थगिती द्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष एस.ए. मईंग, एम.जी. जाधव, एन.के. सरकटे, व्ही.एस. उचित, व्ही. एम. पाटील, एम.बी. पाईकराव, आर.जी. कऱ्हाळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.