तीन दिवसांत सात हजार क्विंटल हळदीची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:20 AM2021-06-24T04:20:59+5:302021-06-24T04:20:59+5:30
हिंगोली : पेरणीचे दिवस सद्य:स्थितीत संपले असून, शेतकरी आपल्याकडील हळद वेळ मिळेल तशी घेऊन येत आहेत. या आठवड्यातील तीन ...
हिंगोली : पेरणीचे दिवस सद्य:स्थितीत संपले असून, शेतकरी आपल्याकडील हळद वेळ मिळेल तशी घेऊन येत आहेत. या आठवड्यातील तीन दिवसांत जवळपास सात हजार क्विंटल हळदीची खरेदी झाल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नारायण पाटील यांनी दिली.
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती हळदीसाठी चांगले मार्केट असल्यामुळे अमरावती, अकोला, अचलपूर, उमरखेड, ढाणकी, परभणी, गंगाखेड, मंठा, आदी ठिकाणांहून शेतकरी हळद घेऊन येतात. मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार हे चार दिवस कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्याचे पाहून शेतकरी सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी शेतीमाल घेऊन येतात. सध्या हळदीला सहा ते सात हजार ५०० रुपये असा भाव दिला जात आहे. चालू आठवड्यात जवळपास दोन हजार क्विंटल हळद खरेदीसाठी आणण्यात आली होती.
गत आठवड्यात पेरणीचे दिवस असल्यामुळे शेतकऱ्यांंना कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतीमाल आणता आला नाही. काही शेतकऱ्यांनी मात्र वेळात वेळ काढून हळद आणली होती. मागच्या आठवड्यात पाच हजार क्विंटल हळद खरेदी झाल्याचेही कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव पाटील यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी कोरोनाचे नियम पाळावेत
कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतीमाल आणतेवेळेस कोरोनाच्या नियमांचे पालन करावे. कृषी दुकाने तसेच बाजारपेठेत विनाकारण गर्दी करू नये. प्रत्येक शेतकऱ्याने मास्कचा पुरेपूर वापर करावा, असे आवाहनही कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांना केले आहे.