झेंडूच्या फुलावरून झाले भांडण; गुन्हा दाखल झाल्याने पोलीस मित्राने नैराश्यात जाळून घेतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 12:42 PM2020-11-14T12:42:46+5:302020-11-14T12:43:07+5:30
पोलीस मित्र असतानासुद्धा पोलिसांनी माझ्या विरोधात गुन्हा दाखल केल्यामुळे त्याच्या मनावर त्याचा खोलवर झाला.
शिरड शहापूर (जि. हिंगोली) : वसमत तालुक्यातील चोंढी आंबा येथील एका पोलीस मित्र युवकावर गुन्हा दाखल झाल्याने निराशेतून त्याने भर रस्त्यावर पेट्राेल टाकून पेटवून घेतले. ही घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. हा युवक गंभीर भाजला आहे.
चोंढी आंबा येथे झेंडूच्या फुलांचे पैसे मागण्यावरून संदीप नागोराव भोसले व परसराम मुरलीधर भोसले या दोघांत भांडण झाले होेते. संदीप भोसले यांनी कुरुंदा पोलीस ठाण्यात भांडण झल्याची तक्रार दिली होती. या तक्रारीवरून परसराम भोसले विरोधात गुन्हा दाखल झाला. मी पोलीस मित्र असतानासुद्धा पोलिसांनी माझ्या विरोधात गुन्हा दाखल केल्यामुळे त्याच्या मनावर त्याचा खोलवर झाला. माझी समाजात बदनामी झाली, असे म्हणून १३ नोव्हेंबर रोजी औंढा- वसमत या राज्य रस्त्यावर कुरुंदा टी पाॅइंटवर परसराम भोसले आला. त्याने याबाबत प्रचंड आरडाओरड केली. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतले. यात तो गंभीर जखमी झाला आहे. परिसरातील नागरिकांनी आग विझवून नांदेड येथील रुग्णालयात पाठविले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद झाली नाही.
दुसऱ्या गटाची अशी आहे तक्रार
झेंडूची फुले विकत असताना परसराम भोसले हा तेथे आला. झेंडूची फुले विकल्याने त्याचे पैसे मला का देत नाहीस म्हणून मारहाण केली. यात डाव्या हाताचा अंगठा व मधल्या बोटास दुखापत झली. तसेच माझ्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिली, असे संदीप भोसलेच्या फिर्यादीत म्हटले आहे.