हिंगोली जिल्ह्यात रबीच्या पेरण्यांची उशिराने लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 05:32 PM2019-11-16T17:32:42+5:302019-11-16T17:34:40+5:30
पाऊस लांबल्याने खरिपाचे मोठे नुकसान
- विजय पाटील
हिंगोली : जिल्ह्यात दिवाळीनंतरही बेमोसमी पावसाचा हाहाकार सुरूच असल्याने शेतकऱ्यांनी रबीच्या पेरण्यांची तयारी आता सुरू केली आहे. सध्या हरभऱ्याची पेरणी सुरू झाली असून अवघ्या पाच टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.
जिल्ह्यात नोव्हेंबरच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यापर्यंत काही भागात पावसाने हजेरी लावली होती. शिवाय तोपर्यंतही खरिपाची पिके काढायला पावसाने संधीच दिली नाही. त्यात मोठे नुकसानही झाले. शिवाय पंचनाम्यांसाठीही शेतकऱ्यांनी शेतातील पीक काढणी व मळणी थांबविली होती. त्यामुळे लांबलेल्या या पावसामुळे रबीच्या पेरण्याची तयारी करण्यासाठी शेतीची मशागत करायलाही शेतकऱ्यांना वेळ मिळाला नाही. ज्या शेतकऱ्यांचे पीक दिवाळीपूर्वी व अतिवृष्टी होण्यापूर्वी निघाले, अशांचीच पाच टक्क्यांच्या आसपास पेरणी झाली आहे. इतर शेतकरी आता शेतातील पाण्याचा निचरा झाल्याने मशागतीच्या कामाला लागल्याचे दिसत आहे.
गतवर्षी केवळ ८९000 हजार हेक्टरवर रबीची पेरणी झाली होती. यंदा अडीच लाख हेक्टरवर रबीची पेरणी होण्याचा अंदाज आहे. कृषी विभागाने गहू ४५ हजार ६२९ हेक्टर, हरभरा १.४८ लाख हेक्टर, रबी ज्वारी १२ हजार ६२३ हेक्टर, रबी मका ३ हजार ८१ हेक्टर, करडई ३६३ हेक्टर, सूर्यफूल १00 हेक्टर क्षेत्रात घेतले जाईल, असा २.१0 लाख हेक्टरवर रबी पेरणी होण्याचा अंदाज आहे.
हरभरा, उसाचे क्षेत्र वाढणार
तुडुंब भरलेले जलसाठे लक्षात घेता यंदा हरभऱ्याच्या क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तर थंडीची चाहूल लागल्याने आता गव्हाचे क्षेत्रही वाढणार आहे. त्यामुळे आणखी चाळीस हजार हेक्टरवर एकतर रबीची पेरणी होईल अन्यथा उसासह इतर पिकांकडे शेतकरी वळतील, असे दिसत आहे.
...........