हिंगोली जिल्ह्यात पहिली ते पाचवी व सहावी ते आठवीतील मुलांना वेगवेगळ्या निकषाने धान्य वाटप करण्यात आले. यात एप्रिल ते जून या काळात ३४ दिवसांसाठी १ ते ५ साठी २६० मे.टन तर ६ ते ८ साठी १६५ मे.टन तांदूळ वाटप झाला. जुलै ते सप्टेंबरदरम्यान ६० दिवसांसाठी १ ते ५ साठी ६५९ मे.टन तर ६ ते ८ साठी ५३६ मे.टन, ऑक्टोबर व नोव्हेंबरदरम्यान ५६ दिवसांसाठी १ ते ५ साठी ५८५ मे.टन तर ६ ते ८ साठी ४९४ मे.टन तांदळाचे वाटप शासकीय गोदामातून करण्यात आले आहे. यात १ ते ५ साठी १ किलो ६५० ग्रॅम प्रतिविद्यार्थी तर ६ ते ८ साठी २ किलो ४७५ ग्रॅम प्रतिविद्यार्थी वाटप करण्यास सांगण्यात आले होते.
शासकीय पुरवठा न होणारी मटकी व मसूर डाळ मात्र पोषण आहार कंत्राटदाराकडून दिली जाते. त्याची देयके सादर झाल्यावर ही आकडेवारी कळते. ही डाळही प्रतिविद्यार्थी ६९० ग्रॅम पहिली ते पाचवी तर ६ ते ८ साठी १.२५ किग्रॅ. वाटपाचे आदेश होते, तर मटकी वाटपासाठीही मानके ठरलेली आहेत.
जि.प.च्या शाळांमधून सहसा याचे वाटप चोखपणे करण्याचा प्रयत्न होतो. मात्र, अनेक खाजगी शाळांतून कोरोनाशिवायच्या काळातच या पोषण आहाराचे वाटप होत नाही. आता कोरोनाच्या काळातील माल तर अशा शाळांना बोनस स्वरूपातच मिळाल्याचे दिसत आहे. याबाबत शालेय पोषण आहार निरीक्षकांकडून कायम अक्षम्य दुर्लक्ष होत असते. याबाबत वारंवार सांगूनही अनेक ठिकाणी कोणताच फरक दिसत नाही. मात्र, आता प्रत्यक्ष वाटपाची पालक व विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीनिशी माहिती मागविल्याने अनेक शाळांची गोची होणार आहे.