हिंगोली : धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून घेण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धनगर समाजाच्या वतीने ढोल जागर आंदोलन करण्यात आले.
मागील अनेक वर्षांपासून धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्यासाठी आंदोलने केली जात आहे. परंतु अद्याप धनगर समाजबांधवांची मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे राज्यव्यापी आंदोलनात हिंगोली जिल्ह्यातील धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाला होता. आंदोलनात सहभागी युवकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली.
आंदोलकांनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. निवेदनावर शशिकांत वडकुते, अॅड. ढाले, अशोक श्रीरामे, विनोद नाईक, शिवाजी ढाले, संभाजी देवकते आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. यासोबतच वसमत, कळमनुरी, सेनगाव व औंढा नागनाथ प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनास निवेदन दिले.