हिंगोली : कोरोनाचा कहर वाढत चालल्याने जिल्हा प्रशासनाने १ ते ७ मार्चदरम्यान जिल्ह्यात संचारबंदी जाहीर केली आहे. या काळात गैरसोय होऊ नये, यासाठी नागरिकांनी २८ फेब्रुवारी रोजी बाजारपेठेत खरेदीसाठी दिवसभर अलाेट गर्दी केली होती.
जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. चार दिवस सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करूनही रुग्ण संख्येला अटकाव बसत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने १ ते ७ मार्चदरम्यान संचारबंदी जाहीर केली आहे. संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर सलग सात दिवस दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. मागील लॉकडाऊनच्या काळात झालेली गैरसोय लक्षात घेता, नागरिकांनी रविवारी हिंगोली शहरात जीवनावश्यक विविध वस्तू खरेदीसाठी गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले. एरव्ही दर रविवारी बाजारपेठेत शुकशुकाट असतो. मात्र, संचारबंदीमुळे रविवारी नागरिकांची दिवसभर खरेदीसाठी धावपळ झाली. किमान आठ दिवस पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा खरेदी करण्यावर अनेकांचा भर होता. भाजीपाला, किराणा दुकानावर मोठी गर्दी दिसून आली. विशेष म्हणजे एरवी भाजीपाल्याचे भाव गडगडलेले असतात. यावेळी व्यापाऱ्यांनी संचारबंदीचा फायदा उठवत भाजीपाल्याच्या दरात २० टक्के वाढ केल्याचे ग्राहकांनी सांगितले. किराणा सामानासाठीही ग्राहक सकाळपासून धावपळ करत होते. यावेळी किराणा दुकानदारांची किराणा साहित्य देताना मोठी दमछाक होत होती. गांधी चौक, महावीर स्तंभ, जवाहर राेड याठिकाणी गर्दी हाेत असल्याने वाहन उभे करण्यासाठी जागा शोधावी लागत होती. अशीच स्थिती पेट्रोल पंपावरही दिसून आली. पेट्रोल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शिवाय केशकर्तनालयातही अनेकांनी नंबर लावले होते. अत्यावश्यक साहित्य खरेदीसाठी आठवण करत साहित्य खरेदी करत हाेते.
गावाकडे परतण्यासाठी कसरत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थही खरेदीसाठी हिंगोली शहरात दाखल झाले होते. अनेकांनी दुचाकी आणणेच पसंत केले. मात्र, ज्यांच्याकडे दुचाकी नाही, अशा ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागत होती. त्यात सायंकाळी ७ वाजता बाजारपेठ बंद होणार असल्याच्या भीतीने ग्रामस्थ खरेदीसाठी घाई करीत गावाकडे जाण्यासाठी खासगी प्रवासी वाहने शोधत होते.
घराबाहेर फिरताना आढळून आल्यास कारवाई
संचारबंदी कालावधीत संचाराची मुभा दिलेल्या व्यक्तिंना सामाजिक अंतर, तसेच मास्कचा वापर करणे बंधनकारक राहणार आहे. संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवा, परवानगी घेतलेल्या व्यक्तीशिवाय इतर कोणतीही व्यक्ती रस्त्याने, बाजारपेठेत, गल्लीमध्ये, गावामध्ये, घराबाहेर फिरताना आढळून आल्यास अशा व्यक्तींवर नियमांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे पाेलीस प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.