नमुना आठवरील खरेदी-विक्री बंद..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:31 AM2019-01-21T00:31:06+5:302019-01-21T00:32:17+5:30
गावठाणाबाहेरील जमिनी, मोकळे भूखंड यांची नोंद नमुना नं. ८ वर करून मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री सुरू असल्याचे उघड झाले आहे. अनेक गावामध्ये प्लॉटींगच्या या गोरखधंद्यात लाखोंची उलाढाल होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आखाडा बाळापूर : गावठाणाबाहेरील जमिनी, मोकळे भूखंड यांची नोंद नमुना नं. ८ वर करून मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री सुरू असल्याचे उघड झाले आहे. अनेक गावामध्ये प्लॉटींगच्या या गोरखधंद्यात लाखोंची उलाढाल होत आहे. लोकल एन.ए.च्या नावाखाली हा धंदा सुरू आहे. फक्त नमुना नं. आठ च्या आधारावरील खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद करण्याचे आदेश तहसीलदार कैलासचंद्र कांबळे यांनी कळमनुरीच्या दुय्यम निबंधकास दिले आहेत. त्यामुळे ग्रामसेवक, सरपंच यांना हाताखाली धरून भूखंडमाफियांकडून सुरू असलेल्या गोरखधंद्यावर टाच येणार आहे.
कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर, शेवाळा, कृष्णापूर, कोंढूरसह अनेक गावांमध्ये ग्रामसेवक हे गावठाणाबाहेरील व गावठाणापासून २०० मिटर अंतरावरील शेतजमिनीचे भूखंड तयार करून त्याची नोंद नमुना नं. ८ ला घेत आहेत. तसेच अशा जमिनीवरील बांधकामांना देखील बांधकाम परवाना दिल्या जात आहेत. खुल्या आरक्षीत भूखंडावरही नमुना नं. ८ खाजगी व्यक्तीच्या नावे करून त्याची खरेदी विक्री करून लाखोंची उलाढाल होत आहे. हे सर्व कृत्य बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करीत केवळ नमुना नं. ८ चे आधारावर खरेदी-विक्री व्यवहार पूर्णपणे बंद करण्याचे आदेश तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी दिले आहेत. खरेदी-विक्री करताना दस्तामध्ये अकृषीक परवानगी घेण्यात आली आहे. किंवा नाही याबाबत दक्ष राहून कागदपत्रांची पडताळणी करावी. अकृषीक प्रमाणपत्र नसल्यास खरेदी-विक्री बंद करण्याचे आदेश दिले आहेत. अकृषिक प्रमाणपत्र नसल्यास सदर भूखंड गावठाणाबाहेरील नसल्याचे संबंधीत तलाठ्याचे प्रमाणपत्र घ्यावे, असेही आदेशात म्हटले आहे. ८ जानेवारी २०१९ रोजी तहसीलदार वाघमारे यांनी कळमनुरीच्या दुय्यम निबंधकास हा आदेश दिला आहे. या आदेशामुळे भूखंडमाफिया व सरपंच, ग्रामसेवक यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ग्रामसेवक, सरपंच व भूखंडमाफिया यांच्या संगणमताने अनेक भूखंडाची खरेदी-विक्री करून लाखोची उलाढाल होत आहे. हा गोरखधंदा आता प्रशासनापुढे उघड झाला आहे. हा आदेश दिल्याने या गोरखधंद्याला चाप बसणार आहे. हे पत्र मिळाल्यानंतर अनेक ग्रामसेवक यांनी तहसीलदारांकडे धाव घेतल्याची चर्चा आहे. जुने प्रकरण उकरू नका, अशीही विनंती केल्याचे कळते.
लोकल एन.ए.च्या नियमावलीचा गैरअर्थ लावून अनेक ग्रामसेवक यांना गावठाण बाहेरील व खुल्या भूखंडाचे नमुना नं. ८ ला नोंद करून खरेदी-विक्री होत आहे. याबाबत आखाडा बाळापूर, शेवाळा, कृष्णापूर, कोंढूर, डोंगरगावसह केवळ नमुना नं. आठ वर खरेदी विक्री करू नये, असे आदेश दिले आहेत. जे जूने प्रकरणे बेकायदेशीररित्या खरेदी विक्री केली आहे. त्याची चौकशी करून त्याबाबत ते रद्दबातल करण्याचे दोषींना दंडीत करण्याची कारवाई करण्यात येईल असे प्रतिक्रया तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. या आदेशामुळे मात्र आता भूखंडमाफियांकडून सुरू असलेल्या गोरखधंद्यावर टाच येणार आहे.