ग्रामीण भागात वीजपुरवठा विस्कळीत
कळमनुरी : मागील पंधरा दिवसांपासून ग्रामीण भागातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन वीज कायमस्वरुपी ठेवण्याऐवजी महावितरणच्या वतीने वीज खंडित केली जात आहे. यामुळे वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्राहकांतून होत आहे.
मसोड ते कनका रस्ता खड्डेमय
कळमनुरी : तालुक्यातील मसोड ते कनका या पाच किलोमीटर रस्त्याची मागील काही महिन्यांनपासून दुरवस्था झाली आहे. चिंचोली, नांदुसा, आदी गावांना हा रस्ता जवळचा असल्याने वाहनांची ये-जा या रस्त्यावरून असते. पावसाळ्यापूर्वी हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी वाहनचालक, तसेच गावकऱ्यांनी केली आहे.
वाडी-तांड्यावर पाणीटंचाई
औंढा नागनाथ : तालुक्यातील वाडी-तांड्यांवर मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी येथील नागरिकांना दोन-दोन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. प्रशासनाने नागरिकांची मागणी लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.
मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट
हिंगोली : शहरातील सरस्वतीनगर, आदर्श कॉलेज रोड या भागात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. रात्रीच्या वेळेला मोकाट कुत्रे दबा धरून बसतात. वाहन जवळून गेले की वाहनाचा पाठलाग करतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. नगरपरिषदेच्या संबंधित विभागाने याची दखल घेऊन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
शेतकरी मशागतीत व्यस्त
करंजी : मागील पंधरा-वीस दिवसांपासून करंजी, दारेफळ, गुंडा, विरेगाव, आदी गाव परिसरात शेतकरी शेती मशागतीत व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळातच मशागतीची कामे उरकून घेतली जात आहेत. नांगरणी, पाळी घालणे, काशा वेचणे, आदी कामे करताना शेतकरी दिसून येत आहेत.