जिल्ह्याच्या हद्दीतील सर्व आस्थापना, दुकाने, खानवळी, आदी सकाळी १ एप्रिलच्या सकाळी ७ वाजल्यापासून ते ७ एप्रिलच्या रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. या कालावधीत दूध विक्री केंद्र, दूध विक्रेते यांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत मुभा दिली आहे. शिवाय जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका या कामकाजासाठी चालू राहतील. या कालावधीत बँका केवळ शासकीय कामकाजासाठी चालू राहतील. याकरिता संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना येजा करण्यासाठी मुभा राहील. परंतु, सोबत ओळखपत्र ठेवणे बंधनकारक राहणार आहे. औषधी दुकानेही चालू ठेवण्यास मुभा राहील. पत्रकार व त्यांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांनाही ओळखपत्र ठेवून वार्तांकनाची मुभा आहे. रस्त्यांची कामे, महावितरण, महापारेषणची कामे, पाणीपुरवठा, दूरसंचारची कामे, स्वच्छता, परवानगीप्राप्त वाळू घाटातून वाळू वाहतुकीला मुभा राहणार आहे. पेट्राेलपंपही सुरू राहतील. संचाराची मुभा दिलेल्या व्यक्तींना सामाजिक अंतर, मास्क वापरणे बंधनकारक राहील. याशिवाय इतर कोणीही रस्त्याने, बाजारामध्ये गल्लीत, गावामध्ये, घराबाहेर फिरताना आढळल्यास त्याच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे.
शाळा, महाविद्यालये, मंगल कार्यालये बंद
संचारबंदीच्या या कालावधीत सर्व धार्मिक/प्रार्थना स्थळे, शाळा, महाविद्यालये, सर्व मंगल कार्यालये, लॉन्स बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. मात्र, बाहेरील विद्यार्थी, परजिल्ह्यातील येथे अडकलेले नागरिक यांच्यासाठी परवानाधारक खानावळ, हॉटेल्स केवळ पार्सल सुविधेसाठी सकाळी ९ ते रात्री ७ या वेळेत उघडण्यास मुभा राहणार आहे.