जिल्हाप्रमुखावरील अॅट्रॉसिटीच्या निषेधार्थ शिवसेनेचा औंढा, कळमनुरी शहरात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 03:02 PM2018-12-05T15:02:29+5:302018-12-05T15:04:32+5:30
शिवसेनेच्या वतीने कळमनुरी, औंढा नागनाथ तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
औंढा नागनाथ/कळमनुरी (जि. हिंगोली) : शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष बांगर यांच्यावर मंगळवारी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने औंढा नागनाथ व कळमनुरी शहर बंदचे आवाहन केले होते. गुन्हा मागे घेण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने कळमनुरी, औंढा नागनाथ तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. व्यापाऱ्यांनी बंदला संमिश्र प्रतिसाद दिला.
औंढा नागनाथ येथे नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांना निवेदन दिले तर कळमनुरीत नायब तहसीलदार पी.एम. ऋषी यांना निवेदन देण्यात आले. औंढा नाकनाथ शहरातील डॉ. हेडगेवार चौकामध्ये शिवसैनिक सकाळी ११ वाजता जमले. त्यानंतर बस स्थानक, शासकीय विश्रामगृहामार्गे मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला नंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्यावर राजकीय द्वेषापोटी दाखल केलेला अॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी बुधवारी औंढा शहर कडकडीत बंद ठेवले होते. प्रशासनाने गुन्हा मागे न घेतल्यास शिवसेना जिल्हाभर आंदोलन छेडेल असा इशाराही निवेदनात दिला आहे.
तर कळमनुरी येथील सेनेच्या कार्यालयाजवळ शिवसैनिक सकाळी ११ वाजेच्या दरम्यान जमा झाले. त्यानंतर पोष्ट आॅफिस रोड ते जुने बसस्थानक व शहरातील मुख्य मार्गाने मोर्चा काढण्यात आला तहसील कार्यालयाजवळ निषेध सभाही झाली. येथे अनेकांची मनोगते व्यक्त केले. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.