साहेब, रेमडेसिविर इंजेक्शन तत्काळ पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:27 AM2021-04-19T04:27:04+5:302021-04-19T04:27:04+5:30
हिंगोली : रेमडेसिविर इंजेक्शनचा हिंगोली जिल्ह्यातील एकाही स्टॉकिस्टकडे पत्ता नाही. मात्र, या इंजेक्शनचा काळा बाजार रोखण्यासाठी स्थापन केलेल्या समितीकडेच ...
हिंगोली : रेमडेसिविर इंजेक्शनचा हिंगोली जिल्ह्यातील एकाही स्टॉकिस्टकडे पत्ता नाही. मात्र, या इंजेक्शनचा काळा बाजार रोखण्यासाठी स्थापन केलेल्या समितीकडेच इंजेक्शन असल्याचे समजून अनेकजण या अधिकाऱ्यांनाच मोबाईलवरून संपर्क करून भांडावून सोडत आहेत.
हिंगोली जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा शासकीय रुग्णालय व जिल्ह्यातील अधिकृत कोविड हॉस्पिटललाच पुरवठा व्हावा, यासाठी नियंत्रण समिती स्थापन केली आहे. त्यांनी रोज स्टॉकिस्टकडून आढावा घेऊन त्यांच्याकडे उपलब्ध झालेल्या इंजेक्शनचा पुरवठा कुणाला केला अथवा करायचा, यावर नियंत्रण ठेवायचे आहे. मात्र, काही जणांनी व्हॉटस् ॲप ग्रुपवर रेमडेसिविर इंजेक्शन पाहिजे असल्यास मदतीसाठी मोबाईल क्रमांकासह या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. पाहता पाहता ही पोस्ट इतकी व्हायरल झाली की, या अधिकाऱ्यांना रात्री-बेरात्रीही फोन करून लोक भांडावून सोडत आहेत. त्यामुळे प्रशासनाला पुन्हा पत्र काढून ही समिती फक्त नियंत्रणासाठी आहे, इंजेक्शनचा काळा बाजार रोखण्यासाठी हा उपाय केल्याचे सांगावे लागले.
जिल्ह्यातील एकाही स्टॉकीस्टकडे मागील दोन दिवसांपासून इंजेक्शन उपलब्ध नाहीत. एका दिवशी ४० इंजेक्शन उपलब्ध झाले होते. त्यातील चार एका खासगी सेंटरला तर उर्वरित जिल्हा रुग्णालयाला देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर इंजेक्शनच मिळत नाहीत. आता हे इंजेक्शन कधी येतील, हे सांगणे अवघड आहे. रोजच ते आज किंवा उद्या मिळतील, एवढेच उत्तर ऐकायला मिळत आहे. यावर रुग्णांच्या नातेवाईकांचे समाधान हाेत नाही. इतर पर्यायी औषधांचा वापर आरोग्य विभागाकडून होत असला तरीही नातेवाईकांना रेमडेसिविरच हवे आहे. अनेकांचा एचआरसीटी स्कोअर तर दहाच्या खाली असतानाही रेमडेसिविरसाठी नातेवाईकांची टोळी कामाला लागल्याचे दिसते. ज्यांचा स्कोअर धाेक्याच्या पातळीचा आहे, अशांपेक्षा जास्त ही मंडळी बाजारपेठेत जास्त चौकशा करत फिरत आहे. तर नांदेड, परभणी, वाशिमला जादा दामात इंजेक्शन मिळत असल्याच्या अफवा मग आपोआप लोकांना कामाला लावत आहेत. या इंजेक्शनच्या उपयोगीतेबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत. मात्र, नातेवाईकांना हे इंजेक्शन संजीवनी वाटत असल्याने टंचाईचे हे रूप रौद्र बनत चालले आहे.