काही भागांत कामे सुरू; मजूरांचा मात्र पत्ता नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 12:48 AM2019-02-04T00:48:53+5:302019-02-04T00:50:03+5:30
रोहयोची मजूर उपस्थिती ६४ हजारांवर; दुष्काळ!
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मागील दोन महिन्यांत हळूहळू वाढत चाललेली साप्ताहिक मजूर उपस्थिती शेवटच्या टप्प्यात ६४ हजारांवर पोहोचली. यामुळे दररोज किमान सहा हजार मजूर रोहयोच्या कामांवर येत असल्याचे दिसून येत आहे. दुष्काळी परिस्थितीत याचा मजुरांना दिलासा मिळत आहे. मात्र काही भागात मजुरांविनाच ही कामे सुरू असल्याचेही चित्र आहे.
हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश भागात विदारक दुष्काळी चित्र आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात दिवाळीनंतर अनेक भागात मजुरांकडून कामांची मागणी होताना दिसत होती. वाट पाहून थकलेल्या मजुरांनी स्थलांतराचा मार्ग पत्करला. तशाही जिल्ह्यातील काही भागातील ऊसतोड कामगारांच्या टोळ्या दरवर्षीच स्थलांतर करतात. मोठ्या शहरात बांधकामावर काम करणारे मजूर अधून-मधूनच गावाकडे हजेरी लावतात. यंदा दुष्काळामुळे शेतमजुरांसह शेतकऱ्यांनाही एकतर रोहयोचे काम अथवा स्थलांतर असे दोनच पर्याय होते. मात्र रोहयोचे काम सुरू नसल्याने अनेकांनी स्थलांतराचा मार्ग पत्करला. तर काहींनी गावातच राहून प्रतीक्षा केली. अशांना आता रोहयोच्या कामावर गावातच मजुरी मिळत आहे. या कामांची संख्याही आता वाढत चालली आहे. ग्रामपंचायतींनी कामांचा हजाराचा आकडा ओलांडला आहे. सेनगाव तालुक्यात सर्वाधिक ३0९ कामांवर २१ हजार साप्ताहिक मजूर उपस्थिती आहे. तर औंढ्यात सर्वांत कमी २४१५ मजुरांची उपस्थिती आहे. यंत्रणांच्या कामांची संख्याही वाढली आहे. यंत्रणांनी २३६ कामे सुरू केली असून ६३२0 मजुरांची उपस्थिती आहे. एकूण साप्ताहिक मजूर उपस्थिती ६४ हजार ८0२ च्या घरात पोहोचली आहे.
जिल्ह्यात काही भागात विदारक दुष्काळी चित्र निर्माण झाल्याने मात्र अख्खे गावेच कामाच्या शोधात स्थलांतरीत झाले. विशेष म्हणजे मजूरवर्गाला हाताला काम मिळत नसल्याने दिवाळीनंतर स्थलांतराचे प्रमाण वाढले होते. ऊसतोडीसाठी तसेच वीटाच्या कारखान्यांवर मजूर कामासाठी गेले. यंदा अत्यल्प पर्जन्यमानामुळे बळीराजा हतबल झाला. शेतीत मजूरी करणाºयांचे हाल होत आहेत. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातून मोठ्या संख्येने स्थलांतर झाले. सध्या रोहयोच्या कामांमुळे मजूरांना दिलासा मिळाला.
काही भागात मात्र कामे सुरू असली तरीही त्यावर मजुरांचा पत्ता नसल्याचे चित्र आहे. गावात मजूर उपलब्ध असताना त्यांनाही काम दिले जात नसून कामे मात्र होत आहेत. काही ठिकाणी बाहेरून मजूर आणण्याचा फार्सही होत आहे. ही कामे करताना स्थानिक कामगारांना कामे मिळण्यासाठीही तेवढेच दक्ष राहण्याची काळजी यंत्रणांनी घेण्याची गरज आहे. मजुरांच्या कामाच्या मागणीची चाचपणी तरी निदान होणे गरजेचे आहे.