५५ हजार ८४३ हेक्टरवर रब्बी पिकांचा पेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:52 AM2021-02-05T07:52:02+5:302021-02-05T07:52:02+5:30

कळमनुरी : तालुक्यात रब्बीची पेरणी १५२.२४ टक्के झाली आहे. या वर्षी हिवाळ्यात थंडी कमी झाल्यामुळे रब्बीच्या उत्पादनात २० ...

Sowing of rabi crops on 55 thousand 843 hectares | ५५ हजार ८४३ हेक्टरवर रब्बी पिकांचा पेरा

५५ हजार ८४३ हेक्टरवर रब्बी पिकांचा पेरा

Next

कळमनुरी : तालुक्यात रब्बीची पेरणी १५२.२४ टक्के झाली आहे. या वर्षी हिवाळ्यात थंडी कमी झाल्यामुळे रब्बीच्या उत्पादनात २० ते २५ टक्के घट होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. तालुक्यात रब्बीचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र ३६ हजार ६८० हेक्टर असून, या वर्षी ५५ हजार ८४३ हेक्टरवर रब्बीचा पेरा झाला आहे. रब्बीच्या पेरणीची टक्केवारी १५२.२४ टक्के झाली आहे.

कळमनुरी तालुक्‍यात रब्बी ज्वारीचे

सर्वसाधारण पेरणीक्षेत्र ५४२ हेक्टर असून, या वर्षी १ हजार ५८ हेक्टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाली. ही टक्केवारी १९५.२० टक्के आहे. तालुक्यात गव्हाचे सर्वसाधारण पेरणीक्षेत्र ११ हजार ७७४ हेक्टर असून, १३ हजार २१ हेक्टरवर म्हणजेच ११०.५९ टक्के पेरणी झाली आहे. मक्याचे सर्वसाधारण पेरणीक्षेत्र ९४ हेक्‍टर असून, ४०० हेक्टरवर मक्‍याची पेरणी झाली आहे, हरभऱ्याचे सर्वसाधारण पेरणीक्षेत्र २० हजार ३८३ हेक्टर असून, ४० हजार ६५६ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. ही टक्केवारी १९९.४६ टक्के आहे.

करडईचे सर्वसाधारण पेरणीक्षेत्र २ हजार ९४१ हेक्टर असून, १०४ हेक्टरवर पेरणी झाली. ही टक्केवारी ३.५४ टक्के आहे. हरभरा सध्या फुल व घाट्याच्या अवस्थेत आहे, तर गहू पोटरी व ओंबीच्या अवस्थेत आहे. या वर्षी हिवाळ्यात जोरदार थंडी पडली नाही. फक्त एक महिना भरच थंडी होती. रब्बीच्या पिकांना थंडी आवश्यक असल्याने ही थंडी या वर्षी पडली नाही, त्यामुळे रब्बीच्या उत्पादनात २० ते २५ टक्के घट येण्याची शक्‍यता आहे. मध्यंतरी ढगाळ वातावरण असल्यामुळे गहू व हरभऱ्यावर रोग पसरलेला होता. हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव झाला होता. शेतकऱ्यांनी कीटकनाशकाची फवारणी केली होती.

मागील तीन ते चार वर्षांपासून करडईची पेरणी तालुक्यात झालेली नाही. या वर्षी गोडतेलाचे भाव वाढल्यामुळे ३.५४ टक्के करडईची पेरणी झाली. तालुक्‍यात रब्बी तीळ, सूर्यफुल, जवस या गळीत धान्याचा पेरा झालेला नाही. या वर्षी दमदार पाऊस पडल्यामुळे जलस्तर वाढले आहे. जलस्तर वाढल्यामुळे रब्बीचा पेरा या वर्षी मोठ्या प्रमाणावर झाला आहे, परंतु हिवाळ्यामध्ये म्हणावी तशी थंडी पडली नसल्यामुळे रब्बीच्या उत्पादनात घट येण्याची शक्‍यता कृषी विभागाकडून वर्तविली गेली. या पावसाळ्यात तीन ते चार वेळा अतिवृष्टी झालेली आहे. त्यामुळे सध्या जलस्तर वाढलेले आहे.

तालुक्यात पानी फाउंडेशनच्या वतीने मागील दोन वर्षांपासून जलसंधारणाची मोठ्या प्रमाणावर कामे झाल्यामुळे जलस्रोत वाढलेले आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाणीही झिरपले आहे. त्यामुळे एकंदरीत तालुक्याची जलस्रोत वाढल्यामुळे रब्बीचा पेरा वाढला आहे. या वर्षी थंडीच नसल्यामुळे रब्बी पिकांची वाढ जोमाने झाली नाही. ही वाढ झाली नसल्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Sowing of rabi crops on 55 thousand 843 hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.