सोयाबीनचे दर तीन महिन्यांत दोन हजारांनी वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:27 AM2021-04-19T04:27:00+5:302021-04-19T04:27:00+5:30
हिंगोली : जिल्ह्यात अतिवृष्टीने सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याने उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ...
हिंगोली : जिल्ह्यात अतिवृष्टीने सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याने उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मागील तीन महिन्यांत सोयाबीन प्रतिक्विंटल दोन हजार रुपयांनी वाढले आहेत. या आठवड्यात खाजगी बाजारात सोयाबीन ६ हजार ६७५ प्रतिक्विंटल दराने खरेदी केले जात होते.
जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणावर झाला होता. काही भागात सोयाबीनच्या बियाणाबाबत तक्रारी असल्या तरी बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन चांगले निघाले होते. उत्पादनात वाढ होईल, असा अंदाज बांधला जात असतानाच काढणीच्या वेळी मोठा पाऊस झाला. त्यामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे उताराही घटला. सुरुवातीला सोयाबीन उत्पादनाचा अंदाज न आल्याने खुल्या बाजारपेठेत सोयाबीन साडेतीन हजार रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केले जात होते. त्यानंतर मात्र सोयाबीनच्या दरात सतत वाढ होत गेली; परंतु तोपर्यंत बहुतेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री केले होते. २० जानेवारीपर्यंत खुल्या बाजारपेठेत सोयाबीन ४ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केले जात होते. आता दरात पुन्हा वाढ झाली असून सध्या खुल्या बाजारपेठेत सोयाबीन ६ हजार ६०० रूपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केले जात आहे. तीन महिन्यांत सोयाबीनच्या दरात २ हजार ३०० रुपयांनी वाढ झाली असली तरी खरा फायदा व्यापाऱ्यांनाच होत आहे. शेतकऱ्यांकडे सध्या तरी सोयाबीन शिल्लक असण्याची शक्यता धूसरच आहे.
तूर, हरभऱ्याच्या दरातही वाढ
सोयाबीन पाठोपाठ तूर व हरभऱ्याच्या किमतीतही वाढ झाल्याचे खाजगी बाजार पेठेच्या भाव फलकावरून दिसून येत आहे. या आठवड्यात खाजगी बाजारपेठेत तूर ६ हजार ४५० ते ६ हजार ६५० रुपये दराने खरेदी केली जात होती. मागील तीन महिन्यांपूर्वी तुरीला ५ हजार ४०० ते ५ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता. हरभऱ्याच्या दरातही वाढ झाली असून तीन महिन्यांपूर्वी ४ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी झाली होती. या आठवड्यात ४ हजार ९९० ते ५ हजार ९० रुपये प्रतिक्विंटल दराने हरभरा खरेदी केला जात होता.