हिंगोली : पोलीस विभागाच्या वतीने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्याचे निवारण करण्यासाठी सुरू केलेल्या समाधान हेल्पलाईनच्या माध्यमातून मागील वर्षभरात ११० तक्रारीचे निवारण करण्यात पोलीसांना यश आले आहे.
हिंगाेली पोलीस दलातर्फे समाधान हेल्पलाईनच्या माध्यमातून तक्रार करण्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या तक्रारीवर काय कार्यवाही झाली याबाबतचा अहवाल तक्रारदार पोलिसांना पाठविला जातो. त्यांच्या तक्रारी सोडविण्याला प्राधान्य दिले जाते. कोरोना आजारापूर्वी अधिकारी, कर्मचाऱ्यांना परेडसाठी बोलावण्यात आल्यानंतर तेथेच दरबार भरविण्यात येवून पोलिस कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येत होते. कोरोनामुळे आता समाधान हेल्पलाईनच्या माध्यमातून तक्रारीचे निवारण करण्यात येत आहे. मागील वर्षभरात १०० ते ११० तक्रारींचे निवारण करण्यात पोलीस विभागाला यश आले आहे. तक्रारींचे लगेच निराकरण होत असल्याने पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
प्रतिक्रीया
पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना तक्रार दाखल करण्यासाठी ८६६९९००६९३ हा समाधान हेल्पलाईन नंबर देण्यात आला आहे. याद्वारे पोलीस अधिकारी, कर्मचारी आपली तक्रार दाखल करू शकतात. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली १०० ते ११० तक्रारींचे निवारण करण्यात पोलीस विभागाला यश आले आहे.
- यशवंत काळे, अतिरीक्त पोलीस अधीक्षक, हिंगोली
रजा, पेन्शन संदर्भातील तक्रारींचा समावेश
हिंगोली जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने सुरू केलेल्या समाधान हेल्पलाईनचा चांगलाच फायदा अधिकारी, कर्मचाऱ्यांना होत असल्याचा दिसून येत आहे. रजा मिळणे, पेन्शन, अस्थापनासंदर्भातील तक्रारींचा यात प्रामुख्याने समावेश असून तक्रारींचा लवकरात लवकर निपटारा करण्याचे प्रयत्न पोलीस विभागाचे आहेत.
आतापर्यंत दाखल तक्रारी
जानेवारी - ९
फेब्रुवारी - १०
मार्च-७
एप्रिल -४
मे - ६
जून -११
जुलै - १५
ऑगस्ट- १४
सप्टेंबर -४
ऑक्टोबर -९
नोव्हेंबर -१३
डिसेंबर -७